मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. २३६ प्रभागांसाठी प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यावर ८१२ हरकती दाखल करण्यात आल्या असून त्यापैकी ३९० जणांना आज बोलावण्यात आले असता त्यापैकी ३०० जण उपस्थित राहिल्याने त्यांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
प्रभाग पुनर्रचना -
मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीपूर्वी प्रभाग पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे भाजपाला फायदा झाला असा आरोप केला जात होता. पालिकेचा कार्यकाळ संपत आल्याने निवडणूक होणार आहे. त्यासाठी लोकसंख्या वाढल्याचे कारण देत राज्य सरकारने पालिकेच्या प्रभाग संख्येत ९ ने वाढ करून ही संख्या २३६ इतकी केली आहे. प्रभाग वाढल्याने सर्वच प्रभागांच्या सीमारेषा बदलल्या आहेत.
३०० जण सुनावणीसाठी हजर -
प्रभागांच्या सीमारेषा बदलल्याने त्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या. पालिकेकडे ८१२ हरकती दाखल झाल्या आहेत. त्यावर आजपासून निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, कोंकण विभाग आयुक्त, मुंबई शहर व उपनगर विभागाचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्या समितीपुढे सुनावणी झाली. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सूनवण्या घेण्यात आल्या. शहर विभागातील ३९० जणांना आज सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी ३०० जण सुनावणीसाठी हजर झाले. त्याची आज सुनावणी घेण्यात आली. उद्या बुधवारी उर्वरित लोकांच्या हरकतींवर सुनावणी घेतली जाईल. २ मार्चपर्यंत त्याचा अहवाल ही समिती निवडणूक आयोगाला सादर करेल, असे काकाणी यांनी सांगितले.