मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी आपली जीवाची बाजी लावून काम करत आहेत. मात्र त्यांना प्राथमिक सुविधाही दिल्या जात नसल्याचा प्रकार गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये उघडकीस आला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. नेस्को जंम्बो कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. निलम अंद्राडे यांनी आंदोलनाची दखल घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्राथमिक सुविधांसाठी आंदोलन -
मुंबईत कोरोनाचा प्रसारामुळे रुग्णसंख्येत वाढ होऊन रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्या. त्यासाठी बिकेसी, नेस्को, मुलुंड, दहिसर, वरळी याठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारण्यात आली. या सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. हे कर्मचारी रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत आहेत. नेस्को येथील कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या राहण्यासह खाण्या-पिण्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून रविवारी आंदोलन पुकारले. यासंदर्भातील कोविड योद्ध्यांनी गोरेगाव नेस्को कोविड सेंटर वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती, मात्र तक्रार करुनही कोणतीही दखल घेतली न गेल्याचा आरोप नर्स आणि डॉक्टरांनी करत आंदोलन केले.
आश्वासनानंतर आंदोलन मागे -
गोरेगाव नेस्को कोविड सेंटरमधील नर्स आणि डॉक्टरांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी कोविड सेंटरच्या वरिष्ठांमध्ये आंदोलनानंतर चर्चा झाली. याचर्चेदरम्यान कोविड योद्ध्यांच्या प्राथमिक गरजा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात नेस्कोकडून देण्यात आले आहे. त्यामुळे कोविड योद्ध्यांनी त्यांच्या प्राथमिक गरजांसाठी पुकारलेले आंदोलन मागे घेतल्याची माहिती कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. निलम अंद्राडे यांनी दिली.