मुंबई - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ( Azadi Ka Amrit Mahotsav ) वर्षानिमित्त, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुंबईत दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत 'घरोघरी तिरंगा' अर्थात 'हर घर तिरंगा' ( Har Ghar Tiranga ) अभियान राबवले जाणार आहे. या अभियानात बृहन्मुंबई महानगरपालिका ( Mumbai Municipal Corporation ) क्षेत्रातील सर्व निवासस्थानांवर भारतीय एकात्मतेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी महानगरपालिकेकडून घराघरात, दुकानात, कार्यालयाच्या इमारती येथे तिरंगा झेंडा वाटप सूरु झाले ( distribution of Tiranga in BMC ) आहे. होर्डिंग, बॅनर, भित्तिचित्रे, पथनाट्य, संबंधितांच्या बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे.
५० लाख तिरंग्यांचे वाटप सुरु - केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, 'हर घर तिरंगा' उपक्रमात प्रत्येक घरी, प्रत्येक इमारत तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, विविध संस्था, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी स्वेच्छेने तिरंगा राष्ट्रध्वज फडकवावा म्हणून त्यांना प्रोत्साहित करावयाचे आहे ( Encourage Citizens To Hoist National Flag ). या अनुषंगाने, व्यापार, व्यवसाय, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य आदी क्षेत्रांमध्ये विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांची तसेच स्वयंसहाय्यता गट, बचत गट आणि इतर क्षेत्रांमधील स्वयंसेवक अशी निरनिराळ्या घटकांची मदत घेवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अभियानामध्ये सहभागी होणाऱया कुटुंबे, घरे, इमारती यांची संख्या निश्चित करुन त्यानुसार पालिकेकडून ध्वज उपलब्ध करून दिले जात आहेत. महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातून ३५ लाख निवासस्थाने व विविध आस्थापनामध्ये सुमारे ५० लाख तिरंगा ध्वजाचे विनामूल्य वाटप केले जात आहे. या अभियानाला व्यापक लोकसहभाग मिळावा या दृष्टीने विविध क्षेत्रांमधील संस्थांसह, स्वयंसहाय्यता गट, बचत गट, स्वयंसेवक यांचेदेखील सहाय्य घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
जनजागृतीसाठी हे केले जात आहेत प्रयत्न - 'हर घर तिरंगा' उपक्रमाच्या जनजागृतीसाठी मुंबईमध्ये ६०० ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले आहेत. उद्याने, बसस्टॉप, बस डेपो, रेल्वे स्टेशन, मार्केट, पालिका कार्यालये आदी गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत. भायखळा ई विभाग कार्यालयाद्वारे घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे १५ ऑगस्टपर्यंत पथनाट्य सादर करण्यात येणार आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून शाळांमध्ये पथनाट्य केली जात आहेत. या पथनाट्याच्या माध्यमातून अभियानाविषयी जनजागृती करण्यात आली. आर नॉर्थ विभागातील तरे मार्ग हिंदी शाळा १ मध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. के पश्चिम विभागात जनजागृती करणारी भित्ती चित्रे काढण्यात आली आहेत. दुकानदार आणि व्यापारी यांचा सहभाग असावा म्हणून एफ साऊथ विभाग कार्यालयात व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.