मुंबई - मागील दोन महिन्यापासून बेपत्ता राहून ईडीच्या चौकशीला सामोरं जायला टाळाटाळ करणारे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख काल (सोमवार) स्वतःहून ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडी कडून तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. या अटकेने भाजप नेत्यांमध्ये एक विजयी भाव निर्माण झाला आहे. याची प्रचिती भाजप आमदार नितेश राणे यांच्या ट्विटमधून दिसत आहे. आमदार राणे यांनी ट्विट करत अनिल देशमुख यांना "शुभ दिपावली" तर परिवहन मंत्री अनिल परब यांना, "मेरी ख्रिसमस" असे म्हटले आहे. त्यांच्या सूचक ट्विटने येणाऱ्या काळात अनिल परब यांच्यावर केंद्रीय तपास संस्थांची कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अनिल देशमुख यांना शुभ दिपावली आणि अनिल परब यांना मेरी ख्रिसमस, नितेश राणेंचे सूचक ट्विट अनिल परब यांना मेरी क्रिसमसअनिल देशमुख यांना ईडी कडून अटक करण्यात आल्यानंतर भाजप गटात उत्साहाचं वातावरण आहे. ऐन दिवाळीच्या आगमनावर ही अटक झाल्याने आमदार नितेश राणे यांनी अनिल देशमुख यांना शुभ दिपावली तर या प्रकरणात नाव गुंतले गेलेले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा सुद्धा नंबर लागू शकतो असे सुतोवाच करत पुढच्या महिन्यात ख्रिसमस (नाताळ सण) पर्यंत त्यांना अटक होऊ शकते आणि म्हणूनच "मेरी ख्रिसमस" असं म्हणत त्यांनी अनिल परब यांना 'शुभेच्छा' दिल्या आहेत.
नवाब मलिक व संजय राऊत यांना विशेष धन्यवाद क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून संपूर्ण देशात वातावरण तापलेले असताना, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री, नवाब मलिक व शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने भाजपवर निशाणा साधत आले आहेत. आता याच दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाल्याने भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. म्हणूनच आमदार नितेश राणे यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेवरून टोमणा मारत संजय राऊत व नवाब मलिक यांचे विशेष आभार मानले आहेत.