मुंबई - राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला रोखणे हेच मोठे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू केलेले आहेत. तसेच सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. अनेक जण कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. त्यातच आता गुढीपाडवा देखील कोरोनाच्या बंधनात अडकलेला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यावर राज्य सरकारने काही बंधने घातली आहेत.
गुढीपाडवा सणानिमित्त मिरवणूक व शोभायात्रा काढण्यावर बंदी
राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीमध्ये गुढीपाडवा सणानिमित्त मिरवणूक व शोभायात्रा काढण्यावर बंदी घातलेली आहे. दरवर्षी संपूर्ण मुंबईत विविध ठिकाणी गुढीपाडव्या निमित्त शोभायात्रा काढली जाते. परंतु यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे सगळ्या शोभायात्रांना बंदी घातलेली आहे. त्याचबरोबर सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत गुढीपाडवा साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार मुंबईतल्या नागरिकांकडून सरकारच्या नियमावलीला प्रतिसाद देत अत्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा केला जात आहे.
मुंबईतल्या मंडळांमध्ये गुढीपाडवा अत्यंत साध्या पध्दतीने साजरा
गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतल्या विविध मंडळांकडून सकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते. परंतु मुंबईसह महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्य सरकारने सगळ्याच धार्मिक उत्सवांवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे गुढीपाडवा सणावर सुद्धा सरकारने निर्बंध घातलेले आहेत. मुंबईतल्या मंडळांमध्ये गुढीपाडवा अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. मुंबईमधल्या चेंबूर परिसरातील विजयदुर्ग मंडळाने अत्यंत साधेपणाने हा सण साजरा केलेला आहे. या मंडळाचे अध्यक्ष महेंद्र गजमल यांनी आपल्याशी संवाद साधताना सांगितले की, 'यावर्षी कोरोनाच सावट संपूर्ण राज्यावर असल्यामुळे सरकारच्या निर्बंधांच पालन करत, यावर्षी आम्ही अत्यंत साधेपणाने गुढीपाडवा साजरा करत आहोत. आमच्या मंडळाची शोभायात्रा यावर्षी आम्ही रद्द केलेली आहे. यावर्षी अत्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करतोय, व लोकांनी सुद्धा अत्यंत साधेपणाने गुढीपाडवा साजरा करावा आणि कोरोणाचे नियम पाळून धार्मिक सण उत्सव साजरा करावे असे आवाहन आम्ही करत आहोत', असेही ते म्हणाले.
हेही वाचा - श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनी बनवतायत 'रेडीमेड गुढी'..