मुंबई - राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा गोंधळ दोन दिवस झाले तरी कायम असून, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशा सर्वच पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. एकीकडे भाजपने 6 हजार जागा जिंकल्याचा दावा केला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा दावा खोडून काढत राष्ट्रवादीच सर्वात मोठा पक्ष असल्याचं सांगितलं आहे. राज्यातल्या 13 हजार 295 जागांपैकी राष्ट्रवादीने 3 हजार 276 जागा जिंकल्या असून, काँग्रेसने 1 हजार 938, शिवसेना 2 हजार 406 तर भाजपने 2 हजार 942 जागा जिंकल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले.
भाजपनेच सर्वाधिक जागा जिंकल्या - चंद्रकांत पाटील
दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील भाजपनेच सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. भाजपने या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 6 हजार जागा जिकल्यांचे भाजप प्रवक्ते सांगत आहेत. शिवसेनेला किती जागा मिळाल्या याबाबत शिवसेनेच्या नेत्यांनी भाष्य केले नाही. मात्र सेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत शिवसेना हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवसेना 3113, भाजप 2632, काँग्रेस 1823, राष्ट्रवादी 2400 तर मनसेने 36 जागा जिंकल्या असल्याचे 'सामना'मधून सांगण्यात आले आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आकड्यांचा आधार न घेता महाविकास आघाडीने निवडणुकीत चांगले यश मिळवल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपला 20 टक्के देखील जागा जिकंता आल्या नसल्याची टीका त्यांनी केली आहे.
राज्यात राष्ट्रवादीच्या समर्थकांनी सर्वाधिक जागा जिंकल्या - हसन मुश्रीफ
दरम्यान या पक्षांचा दावा लक्षात घेता एकूण झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींपेक्षा अतिरिक्त जागा लढवल्या गेल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले की, या निवडणुका कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या नाहीत, त्यामुळे कोणी किती जागा मिळवल्या या बाबत अधिकृत माहिती देता येणे शक्य नाही. मात्र निवडून आलेले उमेदवार हे आपल्याच पक्षाचे असल्याचा दावा प्रत्येक पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादीच्या समर्थक पॅनलनेच सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा त्यांनी केला आहे.