मुंबई - मुंबई शहर आणि मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक वाहतूक सुविधा निर्माण करण्यासाठी मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई आणि ठाणे शहरांना जोडण्यासाठी मेट्रो 4 (वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली) आणि मेट्रो 4 अ (कासारवडवली-गायमुख) प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पाला आता जर्मन सरकारकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. जर्मनीतील केएफडब्ल्यू बँकेकडून या प्रकल्पाला 4000 कोटीचे कर्ज देण्यात आले आहे. यासाठी आज सहयाद्री अतिथी गृह येथे केएफडब्ल्यू आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या करार झाला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीएचे अधिकारी, जर्मन बँकेचे अधिकारी उपस्थितीत होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली.
कमी व्याजदरात कर्ज
वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 अ प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या प्रकल्पाचे आता पर्यंत 6 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 15 हजार कोटी खर्च येणार आहे. हा खर्च एमएमआरडीए आणि के एफडब्ल्यू बँक यांच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जर्मनीतील या बॅंकेने कमी व्याजदरात एमएमआरडीएला कर्ज देऊ केले आहे. 15 हजार कोटी पैकी 4000 कोटीचे कर्ज ही बँक देणार आहे. यासाठीच आज बँक आणि एमएमआरडीएमध्ये करार झाला. या करारानुसार एमएमआरडीएला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिल्याची माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 0.29 टक्के आणि 0.07 टक्के दराने हे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.