मुंबई - एका बिल्डरला तसेच त्याच्या अपहरण्याचा गँगस्टर अश्विन नाईक व त्याच्या साथीदारावर आरोप होता. याप्रकरणी दादर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाची मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. काल मंगळवारी कोर्टाने अश्विन नाईक व त्याच्या सात साथीदारांची निर्दोष मुक्तता केली आहे. यामुळे अश्विन नाईक आज तळोजा कारागृहातून बाहेर येणार आहे.
काय आहेत आरोप -
डिसेंबर 2015 मध्ये अश्विन नाईक आणि त्याच्या साथीदारांवर अपहरण आणि खंडणीच्या खटल्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाईकने त्याच्या सात साथीदारांसोबत मुंबईच्या दादर भागातील एका बिल्डरचे अपहरण केल्याचा आरोप होता. 50 लाख रुपयांची खंडणी आणि 6 हजार चौरस फूटाचा फ्लॅट मागितल्याचा त्याच्यावर आरोप झाला होता. याप्रकरणी मुंबईच्या सेशन कोर्टात केस सुरू होती. या दरम्यान अश्विन नाईकचे वकील प्रकाश शेट्टी यांनी पोलिसांकडे कोणताही पुरावा नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.
निर्दोष मुक्तता -
यावर अश्विन नाईक, प्रमोद केळुस्कर, प्रथमेश परब, जनार्दन सकपाळ, राजेश तांबे, अविनाश खेडेकर, मिलिंद परब आणि सुरज पाल यांना अपहरण आणि खंडणी मागणे, खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणे या गुन्हातून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर आर भोसले यांनी निर्दोष मुक्त केले आहे. यामुळे अश्विन नाईक आज तळोजा कारागृहातून बाहेर येणार आहे.