मुंबई - मुंबईसह देशभरात १२ ते १४ वयोगटातील बालकांचे लसीकरण ( Vaccination for Kids ) १६ मार्चपासून सुरू झाले आहे. त्यासाठी १२ लसीकरण केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सोमवारपासून ( दि. २१ मार्च ) सर्व १८१ केंद्रांवर केले जाणार ( Vaccination for Kids in Mumbai ) आहे. या निर्णयामुळे लसीकरणाला वेग येणार आहे. विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपल्यावर शाळांमध्ये लसीकरण शिबीर आयोजित केली जाणार आहेत.
१८१ केंद्रांवर मुलांचे लसीकरण - मुंबईत १८१ पालिका आणि १८ सरकारी लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सोमवारपासून पालिका सर्व १८१ केंद्रांवर मुलांचे लसीकरण सुरू करणार आहे. पालिकेकडे कॉर्बेव्हॅक्स लशीचे ( Vaccine ) एक लाख २० हजार डोस आहेत. हे सर्व डोस सोमवारी सर्व केंद्रांवर वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे मुलांना सर्व केंद्रांवर लसीकरण करता येईल. प्रत्येक लसीकरण केंद्रांवर हजार डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
परीक्षा संपल्यानंतर शाळांमध्ये लसीकरण शिबिरे - मुंबईत सुमारे साडेपाच लाख मुले आहेत. गेल्या चार दिवसांत मुंबईतील १ हजार ५७९ मुलांनी लशीचा पहिला डोस घेतला. पहिल्या तीन दिवसांत त्यांच्या लसीकरणाचा आलेख कमी आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्यावर पालिका आता भर देणार आहे. दरम्यान, शनिवारी १२ ते १४ वयोगटातील १ हजार ३० मुलांना लसीकरण केले गेले. अनेक शाळांमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परीक्षा असणार आहेत. परीक्षा संपल्यानंतर शाळांमध्ये लसीकरण शिबिरे आयोजित करण्याची पालिकेची योजना आहे. परीक्षा संपल्यानंतर मुले निकाल घेण्यासाठी आणि इतर कामांसाठी शाळेत पोहोचतात, अशा वेळी शाळा व्यवस्थापकांच्या मदतीने लसीकरण शिबिरे आयोजित केली जातील, असेही काकाणी यांनी सांगितले.
हेही वाचा - Mumbai Municipal Corporation : पालिका शाळांमधील सभागृहे दोन सत्रात भाडेतत्वावर देण्यास प्रशासनाचा नकार