मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील महामंडळ वाटपाचा तिढा सुटला असून महामंडळ वाटपाबाबत उपसमितीच्या बैठकीत फॉर्म्युला ठरला आहे. लवकरच महामंडळ वाटपाची शक्यता असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते आहे.
लवकरच महामंडळांचे वाटप
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासूनच महामंडळ वाटपाबाबत आघाडी सरकारमध्ये एकमत होताना दिसत नव्हतं. कोणाच्या वाट्याला नेमके किती महामंडळ? याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याने, जवळपास दोन वर्षे महामंडळाच्या वाटपाचा तिढा सुटत नव्हता. मात्र महामंडळ वाटपाच्या बाबत आता तिन्ही पक्षात एकमत झालं असून, लवकरच महामंडळ वाटप करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महामंडळ वाटपाचा फॉर्मुला काय?
महामंडळ वाटपाबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. ज्या खात्यातील मंत्री किंवा जिल्हा मंत्री असेल त्याव्यतिरिक्त इतर पक्षाकडे संबंधित खात्याचे महामंडळ दिले जाईल असा फॉर्म्युला आघाडी सरकार मध्ये निश्चित झाला असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. तसेच तिनही पक्षात महामंडळाचे सामान वाटप होणार असल्याची माहिती आहे. महामंडळाच्या वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या उपसमितीच्या अनेक बैठका पार पडल्या. मात्र महामंडळाच्या वाटपाबाबत फॉर्म्युल्यावर निश्चिती होत नव्हती. पण आता या नव्या फॉर्मुलावर महाविकास आघाडी सरकार मधील तिन्ही पक्षांनी होकार दिल्याने लवकरच महामंडळ वाटप केले जाणार आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महामंडळाचे वाटप
काही दिवसांमध्ये राज्यात महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. दोन वर्षांपासून महामंडळाचे वाटप झाले नसल्याने स्थानिक पातळीवरच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली होती. त्यामुळेच या निवडणुकांआधी महामंडळ वाटप होणे आवश्यक असल्याने महाविकास आघाडी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर महामंडळ वाटपाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - शरद पवार घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट