मुंबई - कथीत 100 कोटी वसुलीप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह हे सद्या फरार आहेत. यावरून संजय निरुपम यांनी एक फोटो ट्वीट करत परमबीरसिंह हे बेल्जियममध्ये असल्याचे म्हटले आहे.
काय आहे संजय निरूपम यांचे ट्वीट? -
परमबीर सिंग यांचा एक फाईल फोटो संजय निरूपम यांनी ट्वीट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, 'हे आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त. यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर हप्तावसुलीचा आरोप केला होता. परमबीर सिंह पाच प्रकरणांमध्ये वाँटेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की ते फरार आहेत. मात्र, आता हे समजते आहे की ते बेल्जियममध्ये आहेत. परमबीर सिंह बेल्जियममध्ये कसे गेले? त्यांना बेल्जियममध्ये सेफली कुणी पाठवलं? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना देशात आणू शकत नाही का?', असे प्रश्न निरूपम यांनी विचारले आहेत.
काय आहे प्रकरण -
परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुल करून देण्याचा दबाव टाकल्याचा आरोप केला होता. ज्यामुळे अनिल देशमुख यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. मात्र, याच प्रकरणात आता परमबीर सिंह हे आरोपी आहेत.
काही दिवसांपूर्वी लंडनला गेल्याची होती चर्चा -
काही वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या नॉट रिचेबल असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह त्यांना पहिले समन्स देण्याअगोदरच देशाबाहेर गेल्याची माहिती पुढे आली होती. सिंग हे चंदीदडमधून नेपाळ आणि नेपाळमार्गे लंडनला पळून गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. तर परमबीर सिंग यांच्या देशाबाहेर पलायनाच्या बातम्यांवर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांमधून अशी माहिती समोर येत असल्याचे म्हटले आहे. याविषयी अजून ठोस माहिती मिळाली नाही, असे वळसे पाटील म्हणाले. तसेच राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याचेही ते म्हणाले होते.
हेही वाचा - 'आयरन लेडी' इंदिरा गांधींचा स्मृतीदिन : काँग्रेस नेते राहूल गांधींनी शक्तिस्थळी केलं अभिवादन