मुंबई - माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे मंत्री पद गमवावे लागलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे यांना आज अखेर राज्य सरकारने निलंबित केले. चार महिन्यांनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, तसे आदेश जारी करण्यात आले आहेत.
अटक केलेल्या तारखेपासून त्यांना पुढील आदेश होईपर्यत निलंबित
संजीव पलांडे हे अप्पर जिल्हाधिकारी असून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ च्या अधिनियम ४(२) (अ) तरतूदीनुसार त्यांच्यावर अटक झालेल्या दिनाकांपासून निलंबित करण्यात येत असल्याचे, शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, त्यांना ४८ तासापेक्षा जास्त पोलीस कस्टडीत ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पलांडे यांना अटक केलेल्या तारखेपासून त्यांना पुढील आदेश होईपर्यत निलंबित करण्यात येत असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करत मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या पूर्व संमतीशिवाय मुख्यालय, सोडता कामा नये असेही त्या आदेशात नमूद केले आहे.
न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळून लावला
मनसुख हिरेन यांच्या हत्याप्रकरणात अटकेत असलेला एपीआय सचिन वाझे यांनाही सुरुवातीला सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर ईडीने ताब्यात घेतले होते. त्यावेळी राज्य सरकारने वाझे यांना अटक करून दिड महिना झाल्यानंतर त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. त्यानंतर आता पलांडे यांच्या निलंबनाचे आज आदेश जारी केले. पालांडे यांनी जामीनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळून लावत त्यांच्या कोठडीत वाढ केली. त्यामुळे अखेर ४ महिन्यानंतर राज्य सरकारने पलांडे यांना निलंबित केले आहे. मात्र, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.