मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. देशमुख यांची ईडी न्यायालयीन कोठडी आज संपत असल्याने त्यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज 13 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना ईडीने मागील वर्षी अटक केली होती. सध्या देशमुख आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.
अनिल देशमुख यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री तथा राज्यपाल यांना पत्र लिहून मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून 100 कोटी वसुली करण्याचे निर्देश निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना देण्यात आले होते असा आरोप सिंग यांनी पत्राद्वारे केला होता त्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा याकरिता एडवोकेट जयश्री पाटील यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर या प्रकरणात सर्वात प्रथम सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या आधार घेत ईडीने देखील गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांना दोन नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज यापूर्वीच मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर या निर्णयाला आव्हान देण्याकरिता अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असून अद्यापपर्यंत देशमुख यांच्या वकील विक्रम चौधरी यांच्याकडूनच युक्तिवाद करण्यात आला असून जामीन अर्जावर ईडीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांचा युक्तिवाद अद्याप बाकी आहे.