मुंबई - गेले काही दिवस मुंबई, ड्रग्ज आणि बॉलिवूड अशी एक वेगळी चर्चा सुरू आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपुत प्रकरणात एनसीबीने केलेल्या तपासात अनेक नावं समोर आली आहेत. यात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. यावरून मुंबईत ड्रग्जचं मोठं जाळं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत गांजा आणि एमडीचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार केला जातो. आज सुमारे तीन लाखांहून अधिक रुपयांच्या 105 ग्रॅमचा 'एमडी'सह दोघांना बोरिवली युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. यातील एक आरोपी हा बॉलिवूडमध्ये पूर्वी मेकअपमन म्हणून काम करत असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - 'राहुल गांधींना दिलेली वागणूक म्हणजे लोकशाहीवरील गँगरेप'
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांकडून पोलिसांनी 105 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून, त्याची किंमत 3 लाख २० हजार रुपये आहे. अटकेनंतर या दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवले असून, कोर्टापुढे हजर केले जाणार आहे. बोरिवली येथे काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट 11च्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी बोरिवली येथील राजेंद्र नगर जवळील एस पी टॉवरजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.
यावेळी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना 105 ग्रॅम वजनाचे एमडी सापडले. या एमडी ड्रग्जची किंमत सुमारे तीन लाख रुपये आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात इतर काही आरोपींची नावे समोर आले आहेत. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली असल्याची माहिती आहे.