मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला अजून एक धक्का बसला आहे. समीर कामत, माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्यानंतर आता माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी आज 'शिवबंधन' बांधलं. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
कोण आहेत हेमेंद्र मेहता
हेमेंद्र मेहता हे बोरिवली पश्चिममधून 3 वेळा आमदार होते. पण भाजपकडून गोपाळ शेट्टी यांना विधानसभेला तिकीट देण्यात आलं. त्यावेळी हेमेंद्र मेहता यांनी बंडखोरी केली होती. पुढे मेहता यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा एकदा ते भाजपवासी झाले आणि आज अखेर त्यांनी पुन्हा एकदा भाजपला रामराम ठोकत शिवबंधन हाती बांधलं आहे. दरम्यान, शिवसेनेच्या गुजराती मतदारांना आकर्षित करण्याच्या मोहिमेत मेहता यांचा फायदा होण्याची शक्यता आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून मुंबईमध्ये भाजप पक्ष वाढीसाठी झटणारे, सध्याच्या भाजपच्या नेतृत्वावर नाराज असणारे, हेमेन्द्र मेहता यांनी भाजप पक्षात आपली घुसमट होत असल्याचे सांगितले. यामुळे मी शिवसेनेत दाखल होत असल्याचे मेहता म्हणाले. या प्रवेशावेळी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, आमदार व विभागप्रमुख विलास पोतणीस, युवासेना सचिव वरूण सरदेसाई हे देखील उपस्थित होते.
हेही वाचा - नववर्षाच्या सुरवातीला जेएनपीटीच्या मालवाहतूकीमध्ये 9.14% ची वाढ, सिमेंटची उच्चांकी हाताळणी
हेही वाचा - राज्यात 2 हजार 768 नव्या कोरोना रुग्णांचे निदान; 25 रुग्णांचा मृत्यू