मुंबई - युरोप आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढले आहेत. दक्षिण आफ्रिकेत (New corona Variant in South Africa) कोरोनाचा नवा ओमायक्रोन व्हेरियंट (Omicron New Corona Variant) आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC Precautions) देशाबाहेरून आलेल्या २८६८ प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. त्यापैकी ४ प्रवासी आणि १ जण त्यांच्या सहवासातील असे एकूण ५ जण कोरोना पॉझिटिव्ह (International passengers Corona Positive) आले आहेत. या सर्वांची जीनोम सिक्वेन्सिंग तसेच एस. जीन चाचणी केली जाणार असल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (BMC Additional Commissioner Suresh Kakani) यांनी दिली.
- विमानतळावर तपासणी -
मुंबईसह राज्यात गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला यश आले आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत असतानाच, परदेशातील काही देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तर दक्षिण आफ्रिकेसह काही देशात ओमायक्रॉन कोरोनाचा नवा व्हेरियंट समोर आला आहे. यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेने मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी सुरू केली आहे.
- ५ जण कोरोना पॉझिटिव्ह -
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर गेल्या १० नोव्हेंबरपासून आलेल्या प्रवाशांची माहिती गोळा केली जाते आहे. १० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान ४० देशातून २८६८ प्रवासी मुंबईमध्ये आले आहेत. या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. त्यापैकी सुमारे ५०० जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामधून ४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच या प्रवाशांच्या संपर्कातील १ जण असे एकूण ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
- जीनोम सिक्वेन्सिंग, एस-जीन चाचणी करणार -
परदेशी ४ प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कात आलेला १ जण असे एकूण ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ते कोरोना पॉझिटिव्ह असले तरी त्यांना ओमायक्रोन विषाणूची लागण झाली आहे का याची तपासणी करण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जाणार आहेत. शिवाय नव्या विषाणूची माहिती देणारी ‘एस-जीन’ चाचणीही केली जाणार आहे. त्यासाठी नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. ‘एस-जीन’ चाचणीचा रिपोर्ट उद्या येण्याची शक्यता आहे. या चाचणीमुळे नव्या व्हेरियंटची शक्यता आणि जिनोम सिक्वेसिंग चाचणी व पुढील कार्यवाही करण्यासाठी दिशा मिळणार असल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली.