मुंबई - राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालचा उपसागरमध्ये चक्रीवादळ निर्माण झाले आहे. गुलाब असे नाव या चक्रीवादळाला देण्यात आलेले आहे. संध्याकाळी निर्माण झालेल्या प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर झाले. सोमवारी या प्रणालीची तीव्रता कमी होईल. मात्र या प्रणालीच्या प्रभावाखाली राज्यामध्ये पुढील पाच दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाला आहे त्याबरोबरच या चक्रीवादळाचा परिणाम राज्यात दिसून येणार आहे पावसाचा जोर सोमवारी अधिक वाढण्याचा अंदाज आहे. सोमवार ते बुधवार या काळात पालघरमध्ये वीजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर मुंबईमध्येही सोमवार, मंगळवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठाण्यातही बुधवारपर्यंत पावसाची उपस्थिती कायम असेल.
हे ही वाचा -संततधार पावसामुळे सोयाबीन पिकाची नासाडी, शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारातच
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती येथे सोमवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव येथे मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट आहे. विदर्भात काही ठिकाणी मंगळवारपासून तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बुधवारी पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही बुधवारी मध्यम सरींची शक्यता आहे.
हे ही वाचा - 'गुलाब' चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही प्रभाव; राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) म्हणण्यानुसार, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत 48 टक्के भागात प्रमाणापेक्षा खूप जास्त पाऊस झाला. तर सप्टेंबरमधल्या सर्वसाधारण प्रमाणाच्या तुलनेत देशभरात 129 टक्के अधिक पाऊस झाला. 10 ते 14 सप्टेंबर या चार-पाच दिवसांत तर दिल्ली, लखनौ, गोवा, ओडिशा या राज्यांत पावसाने हाहाकार माजवला आणि जनजीवन विस्कळीत झालं होत.
२७ व २८ सप्टेंबरला नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक २६ सप्टेंबर रोजी दुपारी ०१:०० वाजता दिलेल्या सूचनेनुसार दिनांक २७ व २८ सप्टेंबर २०२१ हे दोन दिवस नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यासाठी दोन दिवस अनुक्रमे ऑरेंज व यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
१ ) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
२ ) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
३ ) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
४ ) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखडी वस्तूंपासून दूर रहा.
५ ) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका
१ ) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
२ ) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
३ ) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
४ ) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
५ ) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.