मुंबई : मुंबई सेंट्रल स्थानकांवर प्रवाशांना विश्रांतीसाठी जपानच्या धर्तीवर संपूर्ण सुखसोयींनी सुसज्ज असलेले देशातील पहिले 'पॉड हॉटेल प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. या पॉड हॉटेल उद्घाटन बुधवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध विकास कामांचे लोकार्पणही रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री, रामदास आठवले, पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आज या कामांचे उद्घाटन
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते चर्चगेट येथे आयोजित एका कार्यक्रमात रेल्वे सार्वजनिक तक्रार कार्यालयाचे उद्घाटन, पुनर्निर्मित फ्रेरे रोड ओव्हर ब्रिज, पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागातील एकात्मिक देखरेख प्रणाली, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील अत्याधुनिक पॉड संकल्पना आधारीत विश्रमालय कक्षाचे उद्घाटनही करण्यात आले. याशिवाय अंबरनाथ आणि कोपर रेल्वे स्थानकांवरील होम प्लॅटफॉर्म, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात फूट ओव्हर ब्रिज, एस्केलेटर, लिफ्ट्स आणि टॉयलेट ब्लॉक्स, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कोच रेस्टॉरंट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथील एक्झिक्युटिव्ह वेटिंग हॉलचे लोकार्पण देखील करण्यात आले.
रेल्वेच्या विविध नाविन्यपूर्ण कल्पना
रेल्वेचा उदघाटन कार्यक्रमात बोलत असताना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार काम करण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे. सौंदर्यपूर्ण सुधार होण्यासाठी आणि आपल्या मूल्यवान ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी रेल्वे विविध नाविन्यपूर्ण कल्पना राबवत आहे. स्टेशन डेव्हलपमेंट, वंदे भारत ट्रेन, रामायण सर्किट ट्रेन, बुलेट ट्रेन आणि डीएफसी (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) हे काही प्रकल्प आहेत. ज्यावर रेल्वे काम करत आहे. स्वच्छता आणि सुरक्षितता याला नेहमीच रेल्वेचे प्राधान्य असते. रेल्वेचे सुनिश्चित कालावधीत रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रयत्नांबद्दल रेल्वे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन सुद्धा दानवे यांनी केले आहे.