मुंबई - मंगळवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करणारं 3 पानी पत्रक जाहीर केलं. या पत्रकात त्यांनी 'अभी नही तो कभी नही' म्हणत मशिदींसमोर जोरात भोंगे लावण्याचं ( Mosque Loudspeaker Controversy ) आवाहन केलं. याचा परिणामदेखील आज पाहायला मिळाला. मात्र, याच तणावाच्या वातावरणात मनसेच्या नेत्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. पण आज मिळालेल्या प्रतिसादाच्या आनंदाच्या भरात मनसे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande ) व संतोष धुरी ( Santosh Dhuri ) राज ठाकरे यांना भेटायला शिवतीर्थ या निवासस्थानी आले होते. याच वेळी इथं उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संदीप देशपांडे पोलिसांच्या हातून निसटले. पण कायद्याच्या कचाट्यात अडकले. दरम्यान, या प्रकरणी संदिप देशपांडेविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं? - मनसे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी आज भोंगे विरुद्ध अजानला जो काही प्रतिसाद मिळाला. त्यासंदर्भात राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिल्या. मात्र, त्याच वेळी इथं बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यात झालेल्या चेंगराचेंगरीत धक्का लागून एक महिला पोलीस कर्मचारी खाली पडल्या व जखमी झाल्या. महिला पोलीस कर्मचारी पडल्याचे पाहून संदीप देशपांडे यांच्या ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवत गाडी तिथून बाहेर काढली व देशपांडे पसार झाले पण संतोष धुरी मात्र अडकले.
पोलिसांच्या हातून निसटले पण.. - संदीप देशपांडे पोलिसांच्या तावडीतून सुटले खरे. पण ते आता कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्याने आता पोलिसांनी देखील ही गोष्ट गांभीर्याने घेत संदीप देशपांडे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. याप्रकरणी पोलीस सध्या पुरावे गोळा करत असून परिसरातील सीसीटीव्ही, माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेले व्हिडिओ तपासले जात आहेत.
देशपांडे शोध सुरू - सध्या संदीप देशपांडे पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचसह विविध शाखा संदीप देशपांडे यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे आता या पकडापकडीचा नाट्यात पुढे नेमकं काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.