मुंबई- देशात आलेल्या दुसर्या कोरोनाच्या लाटेमुळे २३ मे रोजी होणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा ८ ऑगस्ट २०२१ रोजी होणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून ही परीक्षा होणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिष्यवृत्तीची परीक्षा रद्द करण्याची मागणी पालक व शिक्षकांकडून होत होती. याची दखल घेत राज्य परीक्षा परिषदेकडून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात ५ मे रोजी पत्र पाठविले. या पत्रामध्ये परिषदेने विद्यार्थ्यांनी वर्षभर परीक्षेची तयारी केली आहे. परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर प्रतिकुल परिणाम होईल, अशी शक्यता आहे. शिवाय गुणवत्ता यादीत येण्याची त्यांची संधी कायमस्वरुपी डावलली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याऐवजी ती पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षण विभागाला केली होती. त्याअनुषंगाने २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही शिष्यवृत्ती परीक्षा आता ८ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले.
हेही वाचा-नवऱ्याला अटक केल्यामुळे शिल्पा शेट्टीची ‘सुपर डान्सर’च्या शूटला दांडी!
कोरोना नियमांचे पालन करून ही परीक्षा होणार
सध्या राज्यात आटोक्यात असलेली कारोनाची परिस्थिती लक्षात घेता कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर शालेय शिक्षण विभागाने ही परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. ८ ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेण्याबाबत सूचना परीक्षा परिषदेला देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना नियमांचे पालन करून ही परीक्षा होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. पाचवी आणि आठवीत असलेले विद्यार्थी आता पुढील वर्गात गेले असले तरी ही परीक्षा देता येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा-सावधान! ...तर तीन अंशांनी वाढणार जागतिक तापमान! संशोधकांनी दिला इशारा
४७ हजार ४६२ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहभाग-
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय व्हावी, या उद्देशाने दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यंदा शिष्यवृत्ती परीक्षेला यंदा राज्यभरातून ६ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ८८ हजार ३३५ तर आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ४४ हजार १४३ इतकी आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ४७ हजार ४६२ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. परीक्षा घेण्यासाठी राज्यभरामध्ये ५ हजार ६८७ इतकी केंद्र नियुक्त करण्यात आली आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची नोंद होत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात आली होती.
हेही वाचा-तुम्हाला हाईपरअॅसिडिटी आहे का? डॉक्टरने सांगितला 'हा' उपचार