मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी ते विरार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहेत. पश्चिम रेल्वेने अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या मार्गावरील उद्यापासून (सोमवार) 15 डब्ब्यांची लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अंधेरी ते विरार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वाहन क्षमता 25 टक्क्यांनी वाढणार -
गेल्या काही वर्षापासून पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. विशेष म्हणजे अंधेरी ते विरार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढलेली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेमध्ये प्रवाशांची आसन क्षमता वाढविण्यासाठी 12 डब्ब्यांच्या 25 सेवा 15 डब्ब्यांमध्ये रुपांतरीत केल्या असून उद्यापासून या लोकल धावणार आहेत. त्यामुळे लोकल सेवांची वाहन क्षमता 25 टक्क्यांनी वाढणार आहे. विशेष म्हणजे 12 डब्यांवरून 15 डब्यांची लोकल करण्यावर रेल्वेचा भर आहे. त्यामुळे एकूण पंचवीस 12 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या 15 डब्यांच्या केल्या आहेत. यापैकी 18 फेऱ्या या धीम्या मार्गावर आणि 7 फेऱ्या जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
60 कोटी रुपयांचा खर्च -
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी ते विरार दरम्यान 14 स्थानकात 15 डब्यांची सेवा चालविण्यासाठी 27 फलाटांची लांबी वाढविण्यात आली आहे. यासाठी एकूण 60 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. अंधेरी ते विरार दरम्यानच्या 40 किमी अंतराच्या 14 स्थानकांमध्ये वेगवेगळे बदल करण्यात आले आहेत. फलाटांची लांबी वाढविणे, अंधेरी, भाईंदर, वसई रोड आणि विरार या चार प्रमुख स्थानकावर यार्ड रिमाॅडलिंग, 5 पादचारी पुलांची उभारणी करणे, अशी कामे करण्यात आली आहेत.
अशी वाढली डब्याची संख्या -
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, 1986 मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर 12 डब्ब्यांची लोकल सेवा सुरू करण्यात आली. तर, 2009 मध्ये उपनगरीय मार्गाच्या जलद मार्गावर 15 डबा लोकल सुरू करण्यात आली. तर, आता पुन्हा पश्चिम रेल्वे मार्गावरील धीम्या मार्गावर 15 डब्बांची लोकल सुरू होणार आहे.