मुंबई - आजच्या सामनाच्या आग्रलेखात विरोधी पक्षाचा चांगलाच शालजोड्यातून समाचार घेतला आहे. यामध्ये पंतप्रधान यांनी नुकतेच विरोधी पक्षांवर सरसंधान साधताना विरोधक बौध्दिक बेइमानी करत असल्याचा आरोप केला होता. त्या वाक्याचा आधार घेऊन राज्यात फडणवीस अर्थात विरोधी पक्ष बौद्धिक बेइमानी करत असल्याचा अप्रत्यक्ष टोलाही यामध्ये लगावला आहे.
फडणवीस यांनी पक्षीय राजकारण साधले, पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक 'मुखवटा'
विरोधी पक्ष हे बौद्धिक बेइमानी करीत असून राजकीय फसवेगिरीतही ते आघाडीवर असल्याचे ज्वलंत मत श्री. मोदी यांनी नुकतेच मांडले. विरोधकांनी लोकांना फसवू नये व गोंधळ निर्माण करू नये, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. त्याबरहुकूम राज्यातल्या विरोधी पक्षाने वागायचे ठरवले असेल तर त्यात त्यांचे व राज्याचेही हीत आहे. अर्थात तसे होईल का, हा प्रश्नच आहे. कारण मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक 'मुखवटा' होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा 'चेहरा' होता का? फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाचा दौराही अखेर 'व्हाया ओला दुष्काळ' राजकारण, असाच झाला म्हणायचा!
विरोधी पक्षनेत्यांनी परिस्थितीचा 'आँखों देखा हाल सरकारला सांगायला हवे
महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरपरिस्थितीने शेतकरी नामोहरम झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर मराठवाडा, विदर्भातील पूरग्रस्त भागात गेले. त्यांनी शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकली. अशा प्रकारे विरोधी पक्षाने त्यांचे कर्तव्य बजावले आहे. मात्र, या दौऱ्याचे विरोधी पक्षाने भांडवल केले आहे असा थेट आरोप आजच्या आग्रलेखात करण्यात आला आहे. यामध्ये म्हणलं आहे की, फडणवीस हे पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्याचे शेतीविषयक प्रश्न व आर्थिक घडी याविषयी त्यांना चांगलीच माहिती आहे. पूर, दुष्काळ, अपघातप्रसंगी विरोधी पक्ष असे दौरे करतो, तेव्हा त्यात राजकीय भागच जास्त असतो. संकटय़रस्त अशा प्रसंगी अश्रूंना बांध मोकळा करून देतात व विरोधक त्याच अश्रूंचे भांडवल करून सरकारला धारेवर धरण्याची संधी घेतात. अर्थात श्री. फडणवीस यांच्याविषयी आम्हाला असे काहीच म्हणायचे नाही. विरोधी पक्षनेत्यांनी परिस्थितीचा 'आँखों देखा हाल' पाहिला व आता त्यांनी याबाबत त्यांना जे वाटते ते सरकारला सांगायला हवे.
फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागावी
नैसर्गिक संकटांमुळे पिकाचे नुकसान होते तेव्हा पीक विम्याचे कवच शेतकऱ्यांचे तारणहार ठरते, पण त्या कवचालाच अनेक भोके पडली आहेत. मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, पुळीथ, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, पण केंद्रीय पाहणी पथके वेळेवर आली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना 'अद्याप मदत मिळू शकलेली नाही. कोल्हापूरचे शेतकरी काय सांगतात तेसुद्धा राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी समजून घेतले पाहिजे. आम्हाला आता केवळ तुमच्याकडूनच अपेक्षा आहे,' असे काही शेतकऱ्यांनी म्हणे श्री.फडणवीस व श्री. दरेकर यांना सांगितले. याचा अर्थ असा की, केंद्रातल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी ठाकरे सरकारला सढळ हस्ते मदत करावी. श्री. फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागावी व राज्याचे रखडलेले पैसे आपले वजन वापरून घेऊन यावेत. शेतकरी चिंताग्रस्त आहेच. संकट अस्मानी आहे व त्याच्याशी एकजुटीने लढायला हवे.
सांत्वन हा एक 'मुखवटा' होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा 'चेहरा' होता का?
या पूरग्रस्त दौऱ्याला राजकीय स्वार्थाचा चेहरा होता असा आरोपही आजच्या सामनात करण्यात आला आहे. यामध्ये म्हणल आहे की, 'आमचा मराठवाडय़ाच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केवळ प्रशासनाला जागे करणे, शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवून प्रशासनाकडून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आहे', असे विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस यांनी जाहीर केले. या त्यांच्या विधायक भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पंतप्रधान मोदी हे विरोधकांकडून नेहमीच विधायक भूमिकेची अपेक्षा करतात. विरोधी पक्ष हे बौद्धिक बेइमानी करीत असून राजकीय फसवेगिरीतही ते आघाडीवर असल्याचे ज्वलंत मत श्री. मोदी यांनी नुकतेच मांडले. विरोधकांनी लोकांना फसवू नये व गोंधळ निर्माण करू नये, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. त्याबरहुपूम राज्यातल्या विरोधी पक्षाने वागायचे ठरवले असेल तर त्यात त्यांचे व राज्याचेही हित आहे. अर्थात तसे होईल का, हा प्रश्नच आहे. कारण मराठवाडय़ातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक 'मुखवटा' होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा 'चेहरा' होता का? फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाचा दौराही अखेर 'व्हाया ओला दुष्काळ' राजकारण, असाच झाला म्हणायचा!