मुंबई - रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या ( Woman Railway Traveler ) गालावरचा मुका घेणे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले ( Punishment For Kissing Cheeks ) आहे. तब्बल सात वर्षांनी आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावली ( Accused sentenced after 7 years ) आहे. आरोपीचे नाव किरण सुझा होनावर असून, तो गोव्यातील पणजी येथील निवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण - सीएसएमटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट २०१५ रोजी एक महिला प्रवासी आपल्या मित्रांसोबत हार्बर मार्गावरील गोवंडी ते सीएसएमटी रेल्वे स्टेशन असा प्रवास करत होती. लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १ वर आली असता, किरण सुझा होनावर, या वय ३७ वर्ष इसमाने त्या महिला प्रवासीच्या उजव्या गालाचा मुका घेवून लज्जा उत्पन्न करुन विनयभंग केला होता. त्यानंतर, पीडित महिलेने याबाबत सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात रीतिसर तक्रार दाखल केली होती. लोहमार्ग पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवून आरोपी विरोधात कलम ३५४, ३५४(अ) (१) भा.दं.वि. मधील गुन्हा नोंदविला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक गणपत गोंदके यांनी सदर आरोपीस अटक करुन पुढील तपास सुरु केला. तपासादरम्यान त्यांनी अटक आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त साक्षीदार तसेच सबळ पुरावे संकलित करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
तब्बल सात वर्षाने शिक्षा - तब्बल सात वर्ष खटला न्यायालयात सुरु असताना सर्व साक्षीदारांची तपासणी झाल्यानंतर महानगर दंडाधिकारी व्ही. पी. केदार यांनी आरोपीस १ वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे. सदर खटल्यामध्ये सरकारपक्षाच्यावतीने अभियोक्ता कदौर यु. शेख यांनी कामकाज पाहिले. तसेच खटल्याच्या सुनावणीच्या कामकाजात रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे समन्स व वॉरंटचे कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक पुरुषोत्तम गावडे तसेच कोर्ट अंमलदार पोलीस नाईक, पांडुरंग जंगम यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई - वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, यापुढे विनयभंग करणाऱ्या कोणत्याही इसमाची कायद्यानुसार गय केली जाणार नाही असा संदेश या खटल्याच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. महिलांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यामार्फत यापुढे महिला संदर्भात गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.