मुंबई - मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक अनुचित प्रसंग टळला. एक व्यक्तीने न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या न्यायदानात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र, बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला लागलीच ताब्यात घेतलं. या घटनेमध्ये वापरण्यात आलेले हत्यार सुरक्षा रक्षकाच्या नजरेतून उच्च न्यायलायाच्या परिसरात कसे आले?, असा प्रश्न आता उपस्थित होत ( Ex serviceman attempts suicide in Mumbai High Court ) आहे.
माजी सैनिक तुषार शिंदे ( वय, 55 ) असे या आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तुषार शिंदे यांची वृद्ध आई-वडिलांविरोधात संपत्ती वादातून केस फाईल केली होती. ज्याचा निकाल आई-वडिलांच्या बाजूने लागला. त्यामुळे संपत्ती हातातून गेली या निराशेत तुषार शिंदे यांनी हे पाऊल उचललं. त्यांनी न्यायालयाच्या परिसरातच धारदार हत्याराने हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्तव्यावर असेलल्या पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतलं आणि गंभीर घटना टळली.
तुषार शिंदे घाटकोपर येथे नातेवाईकांकडे राहतात. सध्या ते पोलिसांच्या ताब्यात असून, नातेवाईकांना बोलावण्यात आलेलं आहे. नातेवाईक तिथे पोहोचताच त्यांना नातेवाईकांकडे सोपवलं जाईल. दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर उच्च न्यायालयात एकच खळबळ उडाली. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
नेमकं काय घडलं? - तुषार शिंदे हे माजी सैनिक आहेत. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर दुसऱ्या क्रमांकावर शिंदे यांच्या प्रकरणावर सुनावणी काही निर्देश देण्यासाठी ठेवली होती. ते निर्देश विरोधात गेल्यानं शिंदे अतिशय निराश झाले. सुनावणी संपल्यानंतर वकिलांनी त्यांना बाहेर येण्यास सांगितलं. काही पावलं मागे गेल्यावर शिंदे पुन्हा न्यायमूर्तींच्या दिशेनं वळले आणि अचानक आपल्याजवळील एका छोट्या धारदार कटरनं हातावर तीन वार करून घेतले. ही घटना घडताच न्यायदालनात सारेच स्तब्ध झाले. पण, प्रसंगावधान राखत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी उपस्थित वकिलांच्या मदतीनं तुषार शिंदेला लागलीच ताब्यात घेतलं. गेल्या काही वर्षांपासून घरच्यांशीच सुरू असलेस्या संपत्तीच्या वादाचं प्रकरण सुरू असल्यानं निराशेच्या गर्तेत शिंदेनं हे कृत्य केल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं.
हायकोर्टाची सुरक्षा वाऱ्यावर? - हा प्रकार घडल्यानंतर बंदोबस्तासाठी पोलिसांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट नंबर 4 या मुख्य प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टर मशिन ही गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. तर, गेट नंबर 3 वरील मेटर डिटेक्टर मशिनही गेले काही दिवस बंदच आहे. यासाठी उच्च न्यायालयातील पोलिसांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याला अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे असे अनुचित प्रसंग टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यावश्यक यंत्रणांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे.