मुंबई : एसीबीच्या रडारवर असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबईतून काढता पाय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना माध्यमांमधून तशी माहिती कळत आहे, अजून याबद्दल ठोस माहिती मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.
परमबीर सिंग नेपाळमार्गे गेले लंडनला?
काही वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या नॉट रिचेबल असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग त्यांना पहिले समन्स देण्याअगोदरच देशाबाहेर पळाले आहेत. सिंग हे चंदीदडमधून नेपाळ आणि नेपाळमार्गे लंडनला पळून गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
अजून ठोस माहिती नाही-गृहमंत्री
गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग हे नॉट रिचेबल असून ते कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे. परमबीर सिंग यांच्या देशाबाहेर पलायनाच्या बातम्यांवर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांमधून अशी माहिती समोर येत असल्याचे म्हटले आहे. याविषयी अजून ठोस माहिती मिळाली नाही असे वळसे पाटील म्हणाले. पोलीस परमबीर सिंग यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने रजेवर असताना आपण कुठे आहोत हे कळविणे गरजेचे असते. मात्र सिंग यांनी याबाबतीत काही कळविलेले नाही असे पाटील म्हणाले. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी केंद्र सरकारच्या संपर्कात आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
सिंग यांचे आरोप
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदी बदली झाल्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलिसांना १०० कोटी हप्ता वसूलीचे टार्गेट दिल्याचे आरोप केले होते. याविषयीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्यानंतर ६ हून अधिक प्रकरणांत परमबीर सिंग, ३ पोलीस उपायुक्त आणि डझनभर पोलीस अधिकाऱ्यांच्या सिंडिकेटबद्दल राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये धमकावणे आणि खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात न्यायमूर्ती चांदीवाल चौकशी करत असून आतापर्यंत त्यांनी ५ समन्स पाठवले आहेत. एनआयएने नुकत्याच दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अँटीलियासमोर जिलेटीनच्या कांड्या सापडल्याच्या प्रकरणात परमबीर सिंग यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. आतापर्यंत परमबीर सिंग यांना ५ समन्स पाठवण्यात आले असून नॉन बेलेबल वॉरंटही त्यांच्या नावाने पाठवण्यात आले आहे. तसेच लूकआऊट नोटीसही बजावण्यात आली आहे. सिंग यांचे मुंबई आणि चंदीगडमधील घर बंद असल्याचे सीआयडी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा - अनिल देशमुख आणि परमबीर सिंह कुठे आहेत हे राज्य सरकारला माहिती नाही; अजित पवारांचा खुलासा