मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल, शुक्रवारी लस उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी 'बीसीजी' ही लस टोचून घेतल्याची माहिती दिली. यानंतर बीसीजी लसीची चर्चा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सुरू आहे. याचा कोरोना या विषाणूवर काय प्रभाव होतो का, याविषयी ईटीव्ही भारतने मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी चर्चा करुन घेतलेला हा खास आढावा....
हेही वाचा - सिरम इन्स्टिट्यूट भेटीचे शरद पवारांनी सांगितले 'हे' कारण
'बीसीजी' लसीच्या प्रभावाचा केईएममध्ये अभ्यास...
मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनामुळे जे मृत्यू होत आहेत, त्यात ६० वर्षाहून अधिक वय असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. कोरोना हा श्वसनाचा आजार असल्याने श्वसनाचे आजार होऊ नये म्हणून क्षयरोगविरोधी असलेली बीसीजी लस ६० ते ७५ वयोगटातील व्यक्तींना दिली जात आहे. ही लस कोविड १९वर उपाय म्हणून वापरता येऊ शकतो का, की या लसीद्वारे श्वसनाचे आजार होऊ नयेत म्हणून रोगप्रतिकार शक्ती वाढवली जाऊ शकते, यावर केईएम रुग्णालयात अभ्यास सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
हेही वाचा - पार्थ यांच्या ट्विटवरून शरद पवारांनी 'ही' दिली प्रतिक्रिया
बीसीजी लस वयोवृद्धांना देण्याचा विचार
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाची लागण वयोवृद्ध व्यक्तींना मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. ६० वर्षांवरील व्यक्तींना विविध आजार असल्याने त्यांना कोरोनाची लागण होऊन त्यात त्यांचा मृत्यू होत असल्याचेही समोर आले आहे. त्यासाठी पालिकेने वयोवृद्धांचे मृत्यू रोखण्याचा निर्णय घेतला आहे. वयोवृद्धांना कोरोना झाल्यास त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच वयोवृद्धांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून लहान मुलांना दिली जाणारी क्षयरोगविरोधी बीसीजी लस वयोवृद्धांना देण्याचा विचार पालिका करत आहे. कोरोना संकटसमयी बीसीजी लस वृद्धांसाठी उपयुक्त ठरते का, या दृष्टीने आयसीएमआरने संशोधन हाती घेतले आहे. ही लस दिल्यामुळे कोरोनाची शक्यता, गांभीर्य व मृत्यूदर कमी करता येईल का, ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण करता येईल का याचा अभ्यास चेन्नई, मुंबई, अहमदाबाद, भोपाळ, जोधपूर व नवी दिल्ली या शहरांमध्ये केला जात आहे. पालिकेचे केईएम रुग्णालय व पालिकेचा आरोग्य विभाग मिळून हे संशोधन करत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा - रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि गरीबांचे मृत्यू थांबवा! - देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बीसीजी लस इतर श्वसनाच्या आजारांविरोधातही वाढवते रोग प्रतिकार शक्ती
बीसीजी लस इतर श्वसनाच्या आजारांविरोधातही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात मदत करू शकते. त्यासाठी ६० ते ७५ वयोगटातील निरोगी व्यक्ती तसेच ज्यांना एचआयव्ही किंवा कॅन्सरसारखा असाध्य रोग नसेल अशा व्यक्तींवर बीसीजीची चाचणी केली जात आहे. त्यासाठी स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत केईएम रुग्णालयात स्वॅब टेस्टिंग, अँटीबॉडी, एचआयव्ही चाचण्या केल्यावर ज्यांना हे आजार नाहीत, अशा ३९ जणांना ही लस देण्यात आली आहे. गेले दोन महिने यावर अभ्यास सुरू आहे. लस दिलेल्या लोकांशी दोन महिने टेलिफोनीक संपर्कात राहून त्यांच्यावर कोणता परिणाम होतो का याचा अभ्यास केला जात आहे. तीन आणि सहा महिन्यानंतर त्यांची कोविड आरटीपीसीआर टेस्ट आणि अँटीबॉडी टेस्टही करणार आहोत. सहा महिन्यानंतर ही लस कोविड विरोधात आहे की फक्त श्वसनाच्या आजारांविरोधात आहे हे स्पष्ट होणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.