मुंबई - शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali)यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने तिसरं समन्स बजावलं आहे. (ED Summons to Bhavana Gawali) भावना गवळी यांना 24 नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्यास या समन्सद्वारे सांगण्यात आले आहे. ईडीनं भावना गवळी यांना यापूर्वी दोन समन्स पाठवली होती. मात्र त्यावेळी भावना गवळी ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाल्या नाहीत.
ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर भावना गवळी चौकशीला हजर राहणार का ?
भावना गवळी (Bhavana Gawali) यांना ईडीनं (Enforcement Directorate) यापूर्वी दोन समन्स पाठवली होती. दुसऱ्या समन्सनुसार 4 ऑक्टोबरला भावना गवळींना 4 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तब्येतीचं कारण देत भावना गवळी या चौकशीला हजर राहिल्या नव्हत्या. त्यावेळी त्यांनी ईडी (Enforcement Directorate) चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर भावना गवळी चौकशीला हजर राहणार का हे पाहावं लागणार आहे.
भावना गवळीवर आरोप काय?
भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून (Enforcement Directorate) तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशनकडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं. मात्र ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.
भावना अॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.