मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी, मतदार नोंदणी, मतदान केंद्र आणि ईव्हीएम / व्हिव्हिपॅट संदर्भात माहिती दिली.
बलदेव सिंह म्हणाले, विधानसभा निवडणुका अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे मतदान यादीत नाव नोंदवण्याची अजूनही संधी आहे. दिनांक ३१ ऑगस्ट पर्यंत मतदार यादीत ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंद करण्यात आली असून यात ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७८ महिला, ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष आणि २५९३ तृतियपंथी मतदार आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात १० लाख ७५ हजार ५२८ नवे मतदार, मतदार यादीत सामील झाले असून २ लाख १६ हजार २७८ मतदार वगळले आहेत.
हेही वाचा - नागपूर : आता ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार मुख्याध्यापक.. विद्यार्थ्यांचं नुकसान?
विधानसभेसभा निवडणूक - २०१९ साठी राज्यात ४९ हजार २८४ ठिकाणांवर ९५४७३ मतदान केंद्र असतील. मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी जागृती करण्यात येत आहे. दरम्यान, तरुण मतदारांची नोंदणी वाढली आहे. प्रारुप मतदार यादी तयार झाली आहे. व्हिव्हीपॅट (vvpat) टेस्टिंग देखील झाले आहे. दरम्यान, मतदार केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता असून ईव्हीएम सुरक्षित आहेत. निवडणूक आयोग आणि कोर्टाच्या निकालातून ईव्हिएम बाबत शंका दूर करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - संतापजनक..! नागपुरात १३ वर्षीय मुलीवर स्मशानभूमीत सामूहिक बलात्कार
दरम्यान, सांगली आणि कोल्हापूर पूरग्रस्त भागातील जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी तयार आहेत. या जिल्ह्यातील निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रश्नच नाही. असे बलदेव सिंह यांनी यावेळी सांगितले. तसेच, उमेदवारांना परवानग्या देण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी निवारण करण्यासाठी आयोगच्या मार्गदर्शक सूचना आहेत. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर आयोग कठोर कारवाई करण्यात येईल, असे बलदेव सिंह शेवटी म्हणाले.