जळगाव : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाची लागण झाल्याच्या संशयामुळे खडसे गुरुवारी रात्री उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते.
दरम्यान, उपचारांसाठी दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केले होते. गेल्या आठवडाभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली वैद्यकीय चाचणी करून घ्यावी, कोरोनाची लागण होऊ नये म्हणून इतरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील खडसेंनी केले होते. दरम्यान, मी लवकर कोरोनावर मात करून परत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
दोन्ही अहवाल निगेटिव्ह..
खडसेंच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी खडसेंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून त्यांच्या मुंबईमधील घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्याचा संशय असल्याने खडसेंची तातडीने आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचणी करण्यात आली होती. या दोन्ही चाचणींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना रुटीन चेकअपसाठी नंतर बोलावण्यात आले आहे.
घरीच विश्राम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला..
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे अॅक्शन मोडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. त्या भेटीतूनच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, अशी चर्चा होती. सुदैवाने त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीही, खबरदारी म्हणून त्यांना सध्या घरीच विश्राम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
आधी कन्येलाही झाली आहे लागण..
याच आठवड्यात आधी खडसेंच्या कन्या तथा जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसेंना यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, असे त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर तसेच ट्विटर हँडलवर पोस्ट करत जाहीर केले होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे आपल्या सर्वांपासून काही काळ दूर रहावे लागणार असल्याने वाईट वाटत आहे. परंतु, मी कोरोनाला लवकर हरवून आपल्या सर्वांमध्ये परत येईल, असा विश्वास अॅड. खडसेंनी वर्तवला होता.
हेही वाचा : फुकट मिळालेल्या सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया