मुंबई - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील गैरकारभार रोखण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी विशेष भरारी पथकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमांप्रमाणे पार पाडावी आणि राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी या भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे .
विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात येणाऱ्या या भरारी पथकामध्ये विभाग स्तरावरील केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतील कोणतेही दोन सदस्य, विभागातील अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधी अथवा प्राचार्य तसेच संबंधित शिक्षणाधिकारी अथवा शिक्षण निरीक्षक यांचा या भरारी पथकामध्ये समावेश असणार आहे. यंदा विज्ञान आणि समाजशास्त्रातील शाळेकडून मिळणारे गुण कमी केल्याने राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा टक्का घसरला होता. परिणामी सीबीएससी आणि अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत महाराष्ट्र माध्यमिक अर्थात एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या होत्या. या विद्यार्थ्यांच्या अडचणी सध्या दूर केल्या असल्या तरी प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रारी येत असल्याने या पथकाची नियुक्ती केली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.