मुंबई - पर्ल्स ग्रुप ( Pearls Group news ) कंपनीच्या देशव्यापी 60 हजार कोटी रुपयांच्या पर्ल्स ग्रुप ( ED Seized Pearls Group land ) चिट फंड घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. कंपनीची मुंबई व पुण्यातील तब्बल 75 एकर जमीन, तसेच बँक खात्यातील 7.5 कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत. ईडीने मनी लाॅन्ड्रिंग कायद्यान्वये ही कारवाई केली आहे.
हेही वाचा - 4 वर्षीय मुलाचे अपहरण करणारा सुरक्षारक्षक गजाआड, 50 हजार रुपयांची मागितली होती खंडणी
वसई पट्ट्यात जमिनीची खरेदी करून त्यांचे प्लॉट पाडत सामान्य ग्राहकांना विकणे किंवा मूळ मालकाकडून कमी दराने जागा खरेदी करत चढ्या दराने अन्य कंपन्यांना विकणे, काही जागांची फेरखरेदी करणे, अशा क्लिष्ट व्यवहारांत कोट्यवधी रुपयांची फेरफार केल्याप्रकरणी ईडीने कंपनीच्या मालकीची मुंबई आणि पुण्यातील तब्बल 75 एकर जमीन, तसेच बँक खात्यातील 7.5 कोटी जप्त केले आहेत.
पर्ल्स ग्रुप कंपनीच्या देशव्यापी 60 हजार कोटी रुपयांच्या चीट फंड घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती पुढे आली. त्या अनुषंगाने ईडीने केलेल्या तपासात मुंबईस्थित डीजीपीएल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि. आणि युनिकॉर्न या कंपन्यांना पर्ल्स ग्रुपकडून मोठ्या प्रमाणावर पैसे प्राप्त झाल्याचे समजले. या प्राप्त पैशांतून या कंपन्यांनी पालघर जिल्ह्यातील वसई, तिवरी आदी गावांत मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करण्याचा सपाटा चालवला. यानंतर या दोन्ही कंपन्यांनी काही कंपन्यांशी व्यवहार करत त्या जागेवर उपलब्ध एफएसआय, तसेच निवासी तथा व्यावसायिक प्रकल्प आदींचे व्यवहार करत अमाप नफेखोरी केली.
विकत घेतलेल्या जमिनींची पुन्हा विक्री करणे पुन्हा वेगळ्या जमिनी खरेदी करणे किंवा जमिनीच्या खरेदीचे आमिष दाखवत पैसे घेणे, परंतु जमीन न देणे, व्यवस्था करणे, असे गुंतागुंतीचे व्यवहार केले. हे करताना पर्ल्स ग्रुपकडून मिळणाऱ्या भांडवलामध्ये अनियमितता दिसू नये याकरिता डीजीपीएल आणि युनिकॉर्न या कंपन्यांनी आपल्या कंपनीतील भागभांडवलाचे प्रमाण सातत्याने बदलत ठेवले. प्राथमिक तपासात वसई पट्ट्यातील जागांचे व्यवहार उजेडात आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीट फंड योजना, तसेच जमीन खरेदी योजनेद्वारे जमा झालेल्या पैशांपैकी सुमारे 101 कोटी रुपये पर्ल्स ग्रुपने मुंबईस्थित धनश्री डेव्हलपर कंपनीकडे वळविले. या 101 कोटी रुपयांपैकी 26 कोटी रुपये डीजीपीएल ला वळविण्यात आले, तर दुसऱ्या प्रकरणात पर्ल्स ग्रुपने याच पद्धतीने तब्बल 2 हजार 285 कोटी रुपये एका व्यावसायिकाकडे फिरविले ज्याने डीजीपीएल आणि युनिकॉर्न या दोन कंपन्यांमध्ये 94 कोटी रुपये गुंतविले. डीजीपीएल आणि युनिकॉर्न या दोन कंपन्यांनी या प्राप्त पैशांतून वसईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली आहे.
हेही वाचा - Sanjay Raut name for Rajya Sabha : संजय राऊत मारणार राज्यसभेवर जाण्याचा चौकार