मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या आजाद मैदान युनिटने केलेल्या कारवाईदरम्यान तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचे 600 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एकाला आग्रीपाडा परिसरातून अटक करण्यात आली आहे. अमीन मुस्कू असं या आरोपीचे नाव आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आजाद मैदान युनिटला मिळालेल्या माहितीच्या आधारे, मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील मोहम्मद हुसेन प्ले ग्राउंड याठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी आरोपी दाजी आमनी मुस्कु हा संशयास्पद रितीने फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 600 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या अमली पदार्थाची किमंत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 1 कोटी 80 लाख रुपये एवढी आहे. दरम्यान अटक केलेला आरोपीकडे टांझानियाचे नागरिकत्व असल्याचे समोर आले आहे.
शुक्रवारी देखील दोन आरोपींना अटक
या बरोबरच अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटला मिळालेल्या माहितीवरून कुर्ला पश्चिम येथे 16 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या ताब्यातून 30 ग्राम एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची किमंत 3 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - राज्यात आणखी कठोर निर्बंध लावण्याची आवश्यकता - मुश्रीफ