मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईतील कुरिअर कंपनीवर करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान कुरियरच्या माध्यमातून न्यूझीलंडमध्ये पाठवण्यात येणाऱ्या अमली पदार्थांच्या संदर्भात करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 122 ग्राम एमफेटामाइन अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
हार्ड डिक्समध्ये लपवले पदार्थ
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई युनिटला मिळालेल्या गुप्त माहिती घेऊन कारवाई करण्यात आलेली असून मुंबईतील एका कुरियर एजन्सीच्या माध्यमातून एक पार्सल न्यूझीलंड येथे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचा संशय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आला होता. त्यानुसार सदरच्या कुरियर एजन्सीवर छापा मारून तपासणी केली असता संगणकाच्या हार्ड डिक्समध्ये सदरचे हे अमली पदार्थ लपविण्यात आल्याचे समोर आले आहे.
अद्याप अटक नाही
मानवी शरीराच्या केंद्रीय मज्जासंस्थेला चालना देणारे कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले हे औषध असून याचा वापर नशेसाठीही करण्यात येत असल्याचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या कारवाईदरम्यान अमली पदार्थ जप्त करण्यात आले असले तरी आतापर्यंत यासंदर्भात कुठल्याही व्यक्तीला अटक करण्यात आली नसून अधिक तपास सुरू आहे.