मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आज नवाब मलिक यांनी आणखी एक टि्वट केले आहे. समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडेकर ही ड्रग्ज गोरख धंद्यात सहभागी असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. यासंदर्भातील खटला पुणे न्यायालयात प्रलंबित असल्याचे नवाब यांनी टि्वट करून सांगितले. यावरून त्यांनी समीर यांना जाब विचारला आहे.
नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये काही स्क्रिनशॉट्सही जोडलेले आहेत. 'समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय? तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यावं लागेल. कारण, तिच्याविरोधातली केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे', असे नवाब मलिक यांनी टि्वटमध्ये म्हटलं. त्यांच्या या टि्वटने पुन्हा खळबळ उडवून दिली आहे.
सध्या समीर वानखेडे विरूद्ध अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक असे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. सोबतच चर्चेत असते ती समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर. आता क्रांती रेडकर यांची बहिण हर्षदा रेडकरदेखील प्रकाशात आली आहे. नवाब मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर क्रांती दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे.
क्रांती रेडकर ही मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. समीर वानखेडे यांनी (2017)साली क्रांती रेडकर हिच्याशी विवाह केला होता. त्यांना जुळी मुले आहेत. समीर यांचे क्रांतीहीशी केलेले लग्न दुसरे होते. यापूर्वी त्यांनी एका मुस्लिम तरुणशी विवाह विशेष विवाह कायद्यानुसार लग्न केले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. यामुळे समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली आहे. समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या हिंदू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात १.२५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
हेही वाचा - माझा नवरा खोटारडा नाही, रोज काय स्पष्टीकरण द्यायचे- क्रांती रेडकर