मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर ( Mahaparinirvana Day Guidelines issued ) केल्या आहेत. विदेशात ओमिक्रॉन विषाणूंचा फैलाव वेगाने होत आहे. गर्दी होणारे कार्यक्रम त्यामुळे आयोजित करू नये, असे आवाहन केले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करण्याचे आवाहन -
परदेशात ओमिक्रॉनचा संसर्ग फोफावला आहे. राज्य सरकारने याची धास्ती घेत, उपाययोजना हाती घेतल्या आहेत. येत्या 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी येथे येतात. गेल्या दोन वर्षात कोरोनाचे सावट असल्यामुळे महापरिनिर्वाण दिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता. आता संकट आटोक्यात येत असतानाच तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातो आहे. राज्य सरकार यामुळे अलर्ट मोडवर आले आहे. यंदा गेल्या वर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून गर्दी न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
काय आहेत नवीन सूचना -
- महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करणे.
- कोविड -१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीत "ब्रेक द चेन"अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे.
- भारतीयांसाठी दुःखाचा गांभीर्याने पालन करावयाचा असून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे.
- महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सर्व अनुयायांनी चैत्यभूमीवर न येता घरी राहूनच परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित रहाणार आहे. डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. थर्मल स्क्रिनिंगच्या तपासणीअंती ज्यांचे शरीराचे तापमान सर्वसाधारण असेल त्यांनाच सदर कार्यक्रमास उपस्थित रहाण्यासाठी परवानगी दिली जाईल.
- कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करणे. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.
- महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, शिवाजी पार्क मैदान परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ/पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत. कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढू नयेत.
- राज्यातील सर्व जिल्हे, तालुके यामध्येही आयोजित करण्यात येत असल्याने त्यासंदर्भात स्थानिक, जिल्हा प्रशासनाने कोविड-१९ च्या स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आवश्यक ते सनियंत्रण व उपाययोजना कराव्यात व त्यासंबंधीचे आदेश काढावेत.
- ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन सर्व नागरिकांनी करावे.
हेही वाचा - Mumbai School Reopening : मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार