मुंबई - तरुणांनी, विशेषतः वैद्यकीय विद्यार्थ्यांनी बंग दांपत्यांच्या सामाजिक सेवेच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. आरोग्य विद्यापीठातर्फे, सन्मान्य डी. लिट. पदवी डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना प्रदान करताना मला विशेष आनंद होत आहे. कारण, यातून वैद्यकीय विद्यार्थ्यांसमोर नवे आदर्श निर्माण होत आहेत. असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चौथ्या विशेष पदवी प्रदान समारंभाप्रसंगी केले.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात, राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विद्यापीठाचा चौथा विशेष पदवी प्रदान समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी, प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी, विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांनी दुर्गम व ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि बालमृत्यू आदी क्षेत्रांत मोठया प्रमाणात सेवा केली आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांमधील परस्पर संबंध हा सद्यस्थितीत गांभीर्याने विचार करण्याचा विषय असून, याबाबत आरोग्य विद्यापीठातर्फे सुरु असलेले उपक्रम अधिक सक्षम करण्याची गरज आहे. विद्यापीठाने संशोधनाला अधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे देखील राज्यपालांनी आपल्या भाषणात म्हटले.
याप्रसंगी बोलताना, संमारंभाचे प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी दुर्गम आदीवासी भागांमध्ये तीन दशकांपासून अधिक काळ आरोग्य आणि सामाजिक सेवा केली आहे. आदीवासी भागात बालमृत्यूचे प्रमाण अधिक असून, असे प्रश्न सोडविण्यासाठी या दांपत्याने मोठया प्रमाणात प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण घेत असतांना कौशल्य आणि ज्ञान मिळाले. मात्र, दुर्गम व ग्रामीण भागात आरोग्य सेवा करुन मला जीवनाचा खरा अर्थ समजला आहे. विद्यापीठाने माझ्या आजवरच्या कार्याला ही सन्मान्य पदवी देउन अधिकृत मोहर उमटवली आहे, असे डॉ. अभय बंग यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.