मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण केले जात आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सप्टेंबर महिन्यात मुंबईतील आतापर्यंतच्या विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात २९ लाख ५१ हजार १५७ डोस दिले गेले आहेत. यामध्ये शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांचांही समावेश आहे.
सप्टेंबर महिन्यात दुप्पट लससाठा -
मुंबईत शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर मिळून १६ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ७ वाजेपर्यंत) कोविड-१९ प्रतिबंधक लशीचे १ कोटी २३ लाख ११ हजार ५४१ डोस देण्यात आले. महापालिका प्रशासनाला या कालावधीत एकूण ७७ लाख ६२ हजार ४७० लसींचा साठा प्राप्त झाला. त्यातून आजवर ७६ लाख ९६ हजार ८३३ एवढ्या मात्रा देण्यात आल्या. जुलै, ऑगस्ट महिन्यात सुमारे १० लाख लशींचा सरासरी साठा पालिकेला प्राप्त झाला होता. त्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात जवळपास दुप्पट म्हणजे १९ लाख २५ हजार १४० लससाठा प्राप्त झाला. तरीही संपूर्ण लससाठ्याचा विनियोग होईल, अशा रितीने लसीकरणाला वेग देण्यात आला.
४६४ कोविड लसीकरण केंद्र -
जानेवारी २०२१ मध्ये मुंबई महानगरात शासकीय व महानगरपालिका मिळून एकूण १२ लसीकरण केंद्र होती. तर त्यावेळी एकही खासगी केंद्र नव्हते. आज मुंबई महानगरात शासकीय व महानगरपालिका मिळून ३२५ तर खासगी १३९ असे एकूण ४६४ कोविड लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. लसीकरण केंद्रांची संख्याही योग्यरित्या वाढवत नेल्याने लसीकरणाला गती देण्यास हातभार लागला आहे. मे ते सप्टेंबर २०२१ या काळात शासकीय, महानगरपालिका, खासगी केंद्र असा एकत्रित विचार करता ९८ लाख ६३ हजार ४२३ डोस देण्यात आहे. जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीच्या तुलनेत हा वेग कितीतरी अधिक आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेनेची ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
१ कोटी २३ लाख -
सुरुवातीपासून विचार करता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर मिळून १६ जानेवारी २०२१ ते आज सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ७ वाजेपर्यंत) या कालावधीत कोविड-१९ प्रतिबंधक लशीचे १ कोटी २३ लाख ११ हजार ५४१ इतके डोस देण्यात आले आहेत.