मुंबई : शिवसेना भवन तोडण्याच्या आमदार प्रसाद लाड यांच्या विधानावरून शिवसेना-भाजपत सुरू असलेल्या कलगीतुऱ्यात आता शिवसेना आमदार सुनील राऊत यांनीही उडी घेतली आहे. विनाकारण शिवसेनेला डिवचू नका, वाघाने पंजा उगारला तर महागात पडेल असा इशारा सुनील राऊत यांनी प्रसाद लाड यांना दिला आहे.
सुनील राऊत यांचे ट्विट
सुनील राऊत यांनी ट्विटरवर एक ट्विट टाकून सुनील राऊत यांना इशारा दिला आहे. "विनाकारण शिवसेनेला डिवचू नका, वाघाने पंजा उगारला महागात पडेल" असे ट्विट सुनील राऊत यांनी टाकले आहे. यासोबत त्यांनी एक फोटोही ट्विट केला आहे. यावर "अरे शिवसेना भवन फोडायला तुझा बाप आला पाहिजे. पण दरवर्षी बाप बदलणाऱ्या बाटग्या आधी एका बापाचा तर हो" असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे शिवसेना भवन फोडण्याच्या विधानामुळे शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. प्रसाद लाड यांच्यावर शिवसेना नेत्यांकडून चौफेर टीकास्त्र सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईलने उत्तर दिल्यानंतर आता शिवसेना नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एक झापड देऊ, पुन्हा उठणार नाही - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना स्टाईलने विरोधकांना सूचक इशारा देताना, ‘थप्पड से डर नही लगता…’ या अशा थपडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्या त्यापेक्षा दामदुपटीने दिलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा देऊ. त्यामुळे आम्हाला कोणी थपडा मारण्याची धमकी देऊ नये, असे म्हणत एक झापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही असा इशारा विरोधकांना दिला होता. बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, लाड यांना आमचे शाखाप्रमुख उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया यावर दिली होती.
काय म्हणाले होते लाड?
मुंबईतील भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर टीका करताना वादग्रस्त विधान केले. 'आता आपण माहिममध्ये आलोय म्हणजे सेना भवन फोडणार की काय असे यांना वाटत आहे. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू,' असे लाड म्हणाले होते. यानंतर या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे असताना लाड यांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे सांगत सारवासारव केली होती.
तर त्याला सोडत नाही - फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना तोडफोड करणे आमची संस्कृती नाही असे म्हटले होते. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही आणि जर कुणी आमच्या अंगावर आला तर त्याला सोडत नाही असेही देवेंद्र फडणवीस यावर बोलताना म्हणाले होते.
हेही वाचा - बाटग्यांमुळे भाजपाचा अंतकाळ जवळ, शिवसेनेशी पंगा सोडा नाहीतर औषधाला उरणार नाहीत - शिवसेना