मुंबई - दहिसर येथील शिवसेनेच्या नगरसेविका व मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी मुंबई महापालिकेच्या भगवती रुग्णालयातील डॉक्टरांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नगरसेविकेला निलंबित करावे किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही संपावर जाऊ असा इशारा डॉक्टरांनी दिला होता. याप्रकरणी डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
डॉक्टरांना दिली होती धमकी..
मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार सुरू आहे. हा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच, गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा कोरोनाचा प्रसार सुरू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर नर्स आदी आरोग्य कर्मचारी थकले आहेत. अशात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने पालिकेच्या 6 रुग्णालयातील 168 रुग्णांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे इतर रुग्णालयात हलवावे लागले आहे. यापैकी एक बोरिवली येथील भगवती रुग्णालय आहे. याच रुग्णालयातील कॅज्युल्टी विभागात जाऊन संध्या दोशी यांनी आपण पाठवलेल्या रुग्णाला का बघितले नाही, त्याच्याकडे का लक्ष दिले नाही? असा जाब विचारत आरडा ओरडा केला. डॉक्टरांशीही त्या ओरडून बोलत होत्या. येथील महिला डॉक्टरांना त्यांनी धमकावले. तुम्ही कंत्राटी डॉक्टर आहात तुम्ही आपली तोंड बंद ठेवा, तुम्हाला नोकऱ्या पाहिजे म्हणून इथे काम करताय, तुम्ही ऐरे गैरे डॉक्टर आहात, तुमच्या सारखे दहा डॉक्टर उभे करीन आदी शब्द वापरून डॉक्टरांना धमकावले. नगरसेविका दोशी आरडाओरडा करत असताना ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी वरिष्ठ डॉक्टर येईपर्यंत थांबा अशी विनंती केली. मात्र त्या थांबण्याच्या मनस्थितीत नव्हत्या, त्यांनी आरडाओरड सुरूच ठेवली.
डॉक्टरांचे सामुदायिक राजीनामे..
संध्या दोशी ज्या रुग्णासाठी भांडत होत्या त्या रुग्णाला डॉक्टरांनी त्या येण्याआधीच दाखल करुन घेतले होते. याची कोणतीही शहानिशा न करताच त्यांनी आरडाओरड करून डॉक्टरांना धमकावले. या प्रकरणी नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी किंवा त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टरांची असल्याची माहिती डॉ. सिद्धार्थ गुप्ता व डॉ. निलेश यांनी दिली. या प्रकरणी दोशी यांच्यावर कारवाई न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
तीन दिवसांचा अल्टिमेटम..
सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांवर उपचार करणे गरजेचे आहे. आमच्यावर मोठ्या प्रमाणात ताण आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना आमचे तीन डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत. ते सध्या क्वारंटाईन आहेत. आम्ही डॉक्टर सध्या प्रचंड ताण असताना काम करत आहोत. नगरसेविका संध्या दोशी यांच्यावर कारवाईसाठी आम्ही भगवती रुग्णालय प्रशासनाला 3 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या तीन दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही पुढचा निर्णय घेऊ असे येथील डॉ. सिद्धार्थ गुप्ता यांनी सांगितले.
एका तासातच राजकारण संपले..
रुग्णाला तपासले जात नाही, म्हणून मी रुग्णालयात गेले होते. तासभर रुग्णाला तपासण्यात आले नव्हते. मी डीनला याची माहिती देऊन डॉक्टरांना कसे बोलावे यांच्या सूचना करण्यास सांगितले आहे. काल जे काही राजकारण झाले ते एका तासात संपले आहे. डॉक्टर पुन्हा कामावर पुन्हा रुजू झाले आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी दिली.
हेही वाचा : औरंगाबादच्या जाधववाडी मंडीत तुफान गर्दी, प्रतिबंधात्मक नियमांचा पुरता फज्जा