मुंबई - कोरोनाच्या भयाने खासगी दवाखाने आजही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीत दहिसर बोरिवली विधानसभेत डॉक्टर आपल्या दारी ही अभिनव संकल्पना दहिसर विधानसभेच्या आमदार मनीषा चौधरी यांनी सुरू केली आहे.
गृहनिर्माण संस्थांच्या आवारात डॉक्टर आपल्या दारीची रुग्णवाहिका दाखल होते. यात कार्यरत असलेले दोन डॉक्टर संस्थेतील सदस्यांची तपासणी करतात. या संकल्पनेतून नागरिकांची आरोग्य तपासणी होते. सोबतच कोरोनाबाबत जनजागृतीचे कामही केले जाते. तसेच औषधांचे वाटप केले जाते. दररोज पाचशे जणांची तपासणी यातून केली जाते. या चाचणीदरम्यान कोणा व्यक्तीत कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याची माहिती पालिका प्रभागस्तरावर कळवली जाते. तसेच संपूर्ण तपासणीचा अहवालही पालिकेच्या आरोग्य विभागाकडे देण्यात येतो.
मुंबईतील दहिसर विधानसभेत या जनजागृती व डॉक्टर आपल्या दारी उपक्रमामुळे योग्य वेळी कोरोनाचे निदान होते. त्यामुळे मुंबईतील दहिसरमध्ये कोरोनाचे सर्वांत कमी रुग्ण आढल्याचा दावा आमदार मनीषा चौधरी यांनी केला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आपल्या दारी ही योजना नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.