मुंबई - ईडीने (ED) कोणतीही नोटीस न देता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केलेली कारवाई हे केंद्र सरकारच्या सूडबुद्धीचे द्योतक आहे. या पद्धतीने कारवाई करणे योग्य नसल्याचे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी व्यक्त केले आहे. तसेच या कारवाईमुळे राज्य सरकारला कोणताही धोका नसल्याचेही वळसे पाटील यांनी सांगितले. वळसे पाटील यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर ते बोलत होते. आज ईडीने कारवाई करत संजय राऊत यांची 11.15 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात - राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
मशिदीवरील भोंग्यांविरोधात भाजपचे आंदोलन - राज्यातील मशिदीवरील भोंगे यांच्याविरोधात भाजपाने आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा फार परिणाम होणार नाही. कोणतीही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता आपण घेत असल्याचेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. सध्या राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी भाजपने आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात आता मनसेनेही उडी घेतली आहे.