मुंबई - शालेय शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अनागोंदी कारभार अनेकदा चव्हाटयावर येत असतानाच आता प्रवेश शुल्कासाठीचा नवीन प्रकार समोर आला आहे. देशभरातील बहुतांश ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सारखेच शुल्क आकारले जाते, परंतु शिक्षण विभागाने मात्र मनमानी नियम तयार करून राज्यातील प्रत्येक शहरांसाठी वेगळे शुल्क लावले असल्याने याविषयी सिस्कॉम या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
राज्यात यंदा राबविण्यात येत असलेल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अद्यापही अनेक दोष, त्रुटी या जाणीवपूर्वक ठेवण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात सुधारणा केली जावी म्हणून सिस्कॉम संस्थेकडून अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुधारणा मोहीम राबवली जात आहे. यंदा अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद यांना प्रवेश प्रक्रिया शुल्क 125 रूपये, तर मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी 225 रूपये इतके ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील या सहाही ठिकाणी सारखीच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असताना, मुंबईच्या विद्यार्थ्यांना 100 रुपयांचा अधिक जादा भुर्दंड का? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईतून जवळपास तीन लाख विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात, त्यांचे अतिरिक्त 100 रुपये प्रमाणे तीन कोटी रुपये जादा जमा होणार आहेत. अशा कोणत्या बाबी आहेत की ज्यामुळे मुंबईतील विद्यार्थ्यांना हे तीन कोटी रुपये जादा द्यावे लागणार आहे. यात मोठा गोंधळ असून यासाठीची चौकशी केली जावी, अशी मागणी धारणकर यांनी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेतून मनमाणीपणाने खर्च करून उधळपट्टी केली जात असून जमाखर्चाचे हिशोब योग्य पद्धतीने ठेवलेले नाहीत, हिशोब अव्यवस्थित असल्याने गेले अनेक वर्षात खर्चाचे ऑडिट करण्यात आलेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर या प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख असलेले शिक्षण संचालक दिनकर पाटील हेच जबाबदार असल्याचा आरोप धारणकर यांनी केला आहे.
दरम्यान, पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, यापूर्वीही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबईत सर्वाधिक शुल्क आकारले जात होते. मुंबईत अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र, हेल्पलाईनची सोय अधिक करावी लागते, यासाठी खर्च येतो. म्हणून हे शुल्क अधिक लावण्यात येते असा खुलासा शिक्षण संचालक पाटील यांनी केला.