मुंबई - मुंबईतील साकीनाका येथे घडलेली बलात्काराची घटना ही मन सुन्न करणारी आहे. मुंबई शहराचा लौकिक हा सुरक्षित शहर म्हणून केला जातो. मुंबईत रात्री-अपरात्री महिला, मुली स्वतःला सुरक्षित समजत असतात. मात्र वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे या लौकिकेला तडा जात असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच साकीनाका बलात्कार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. कोर्टात या आरोपींना शिक्षा करेलच. मात्र या गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आज आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली. साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर शुक्रवारी बलात्काराची घटना घडली. या महिलेवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असल्याचाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच शक्ती कायद्यासाठी राज्य सरकार बैठकांवर बैठका घेत आहेत. मात्र अद्यापही त्यामध्ये कुठली प्रगती नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्य सरकारला महिला आयोगाचा अध्यक्ष नेमायला देखील वेळ नाही, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
हे ही वाचा - साकीनाका बलात्कार प्रकरण: आरोपीचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती
राज्य सरकाराबाबत पोलीस विभागात नाराजी -
ज्या प्रकारे पोलीस विभागामध्ये राज्य सरकारची ढवळाढवळ सुरू आहे. यामुळे पोलीस विभाग देखील नाराज आहे. कर्तव्यशील अधिकाऱ्यांना राज्य सरकार बाजूला सारुन त्यांना हव्या असलेल्या अधिकाऱ्यांना पुढे केले जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. पोलीस खात्यामध्ये होणाऱ्या बदल्या या नियमबाह्य सुरू आहेत. याबाबत काही पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याकडे तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा - mumbai nirbhaya case : पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठविला
पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेणे आवश्यक -
बलात्काराच्या घडलेल्या घटनेनंतर अद्यापही कोणत्याही मंत्र्यांनी किंवा पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतलेली नाही. किमान पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली तर प्रशासनावर दबाव तयार होऊन प्रशासन कामाला लागते. तसंच पीडितेच्या कुटुंबाला दिलासा मिळतो. त्यामुळे किमान पालकमंत्र्यांनी तरी पीडित कुटुंबाची भेट घ्यायला हवी होती, असे मत देवेंद्र फडणीस यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश यांची तात्काळ भेट घेऊन, हे प्रकरण डिजिकनेटेड फास्ट कोर्टमध्ये चालवण्याची विनंती केली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.