मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदानातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. विनाअनुदानित शिक्षकांसंदर्भातील आमच्या सरकारचा निर्णय ठाकरे सरकारनं थांबवल्यानं शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंना लगावला आहे.
शिक्षकांना अनुदान आमच्या सरकारने दिलं होतं
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, 20 टक्क्यांचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यामध्ये वाढ करून पुढे तो 40 टक्के करणार होतो. हा निर्णय जवळपास 60 टक्के झाला होता. पुढे काय झालं हे वेगळं सांगायची गरज नाही. सत्ता बदलली तसं गोष्टी बदलल्या. आम्ही घेतलेला निर्णय सत्ता असती तर पुढे राबवता आला असता. इथ हजारो आंदोलनं पाहिली आहेत. पण, आजवर इथे असं होत नव्हतं. आम्ही आंदोलनाची दखल घेत होतो. आंदोलनाकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही. भाजपचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले
विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न आम्ही आजच्या बैठकीत मांडणार आहोत. जर असं जमलं नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही. एकीकडे मुंबईच्या बिल्डरांना 5 हजार कोटींची सुट तर दुसरीकडे तीनशे ते चारशे कोटी रुपये नाहीत. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू. आता शिक्षकांचा अंत बघू नका, असं फडणवीस म्हणाले आहेत.
हेही वाचा - राज्यात पुन्हा टाळेबंदीचा निर्णय होण्याची शक्यता - अजित पवार
हेही वाचा - इंधन दरवाढीची परभणीला राज्यात सर्वाधिक झळ; नागरिक संतप्त