मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( LOP Devendra Fadnavis ) आमने सामने आले. मात्र, ते एकमेकांना न भेटताच निघून गेले. वांद्रे येथे शनिवारी रात्री हा प्रकार घडला. यावेळी मुख्यमंत्री यांचा ताफा येणार असल्याने फडणवीस यांना ट्रॅफिकमध्ये थांबावे लागले.
फडणवीसांचा ताफा अडवला - अशा वतावरणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आनंद दिघे यांच्या जीवनावरील धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी आले होते. तर फडणवीस लिलावती रुग्णालयात खासदार नवनीत राणा यांना भेटण्यास आले होते. आपले कार्यक्रम आटपून हे दोन्ही नेते निघाले असता फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा थांबवण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा येणार असल्याने फडणवीस यांना काही काळ वाट पहावी लागली. मुख्यमंत्र्यांचा ताफा गेल्यावर फडणवीस यांचा ताफा आपल्या मार्गी निघाला.
वाद विकोपाला - राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्याने भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले. यामुळे शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. हिंदुत्व, हनुमान चालीसा, भ्रष्टाचार, ईडी सीबीआय इन्कम आदी कारवायांमुळे दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेला आहे.