मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधत नव्या सरकारची भूमिका संदिग्ध असल्याचा आरोप केला आहे. अजूनही खातेवाटप झाले नसून, मंत्रीमंडळ देखील स्थापन न झाल्याने सरकार जनतेच्या कामांसंदर्भात गंभीर नसल्याचे त्यांनी सांगितले. विकासाच्या मुद्द्यांवर सरकारला मदत करण्यास तयार असल्याचे फडणवीस म्हणाले.
सध्या राज्यात नवे प्रकल्प सुरू करण्याऐवजी जे प्रकल्प आधीपासून सुरू आहेत, ते प्रकल्पच बंद करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुढच्या वर्षी चार कामं कमी करावी लागली, तरी आमची हरकत नाही; पण शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
येत्या 16 डिसेंबरपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यंदा हे अधिवेशन पाच दिवस चालणार असल्याने फडणवीस यांनी खंत व्यक्त केली. सध्या राज्यासमोर असलेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन किमान दोन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी भाजपने केली होती. मात्र, ही मागणी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली नसल्याने हे अधिवेशन फक्त औपचारिकताच आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच हिवाळी अधिवेशनाचे दोन आठवड्यांचे सत्र करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
नुकतेच लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. यामध्ये शिवसेनेने मोदी सरकाला पाठिंबा दिला होता. परंतु, उद्धव ठाकरे यांनी सरकारची विधेयकासंदर्भात भूमिका स्पष्ट नसल्याचे सांगत राज्यसभेत विरोध करणार असल्याचा इशारा दिला.
यावर प्रत्युत्तर देताना, शिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली असून, शिवसेनेने काँग्रेसच्या दबावाखाली येऊ नये, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.