मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्ह्यांची नोंद केली जाते. त्यांना अटक करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून पोलिसांचे पथक धाडले जात आहे. मात्र एवढीच तत्परता राज्य सरकार शर्जील उस्मानी प्रकरणामध्ये का दाखवत नाही? शर्जील उस्मानीला अटक करण्यासाठी पोलिसांची टीम काढली जात नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - ही महाराष्ट्राची परंपरा नाही, जनता जनार्दन कौल देईल - दादा भुसे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन भारतीय जनता पक्षात करत नाही, मात्र मंत्री आणि व्यक्ती म्हणून भारतीय जनता पक्ष नारायण राणे यांच्या मागे उभा असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज फडणवीस यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. मात्र सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. पोलीस राज्य सरकारच्या दबावात येऊन काम करत असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ते वक्तव्य म्हणजे अदखलपात्र गुन्हा
नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य हे अदखलपात्र गुन्हा असून, यासंबंधी चौकशी करायची असेल तर पोलिसांना त्यांना आधी नोटीस द्यावी लागेल. मात्र पोलीस राजकीय दबावापोटी या गुन्ह्याची दखलपात्र गुन्ह्यांमध्ये नोंद करत आहे. तसेच नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक पाठवले जात आहेत. त्यामुळे, पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे. राज्य सरकार कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणात न्यायालयात चपकार खाऊनही काहीही शिकलेले दिसत नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला.
भाजप कार्यालयावर हल्ला झाल्यास सहन करणार नाही
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर ठीक-ठिकाणी शिवसेनेकडून निदर्शने केली जातात. नाशिकमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर देखील दगडफेक करण्यात आली. मात्र, शिवसैनिकांकडून अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला जाणार असेल तर तो कदापि सहन केला जाणार नाही. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर हल्ला झाला आहे त्या हल्लेखोरांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी. हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर, त्या ठिकाणच्या पोलीस आयुक्तालयासमोर मी आणि विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे आंदोलन करतील, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
जन आशीर्वाद यात्रा पूर्ण करणार
नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक धाडले गेले, मात्र नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही. नारायण राणे यांना काही कारणास्तव थांबावे लागले तरी जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही. आमदार प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार हे यात्रा पूर्ण करतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - Video : नारायण राणेंच्या बेताल वक्तव्यावरून राडा, शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी