मुंबई - मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करताना पैशांची आणि वेळेची बचत केली होती. आता मात्र कामाच्या किमतीत वाढ होत असते, ये योग्य नाही. यापुढे २५ कोटीचे काम ५०० कोटी होऊ देऊ नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका आयुक्तांना खडसावले.
मुंबई महापालिका मुख्यालयात पर्यटनाच्या दृष्टीने हेरिटेज वॉकचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पवार बोलत होते. यावेळी बोलताना महापालिकेच्या मुख्यालयाची वास्तू इंग्रजांच्या काळात झाली असली तरी तिच्या आरेखनात, बांधकामात आणि इतर बाजू सांभाळण्यात मराठी माणसांचा सहभाग आहे हे विसरून चालणार नाही. तेव्हाच्या अभियंत्यांनी अंदाजित रमकेपेक्षाही कमी रकमेत वास्तूचे बांधकाम करून शिल्लक रक्कम परत केली, याचा अभिमानाने उल्लेख करून नियोजित वेळेत किंवा त्याआधी काम पूर्ण होईल असे प्रयत्न करा. २५ कोटींची कामे ५०० कोटींवर नेऊन ठेवली जातात. तसे होऊ नये, असे म्हणत त्यांनी आयुक्तांसह सत्ताधाऱ्यांचीही कानउघाडणी केली.
मराठीचा अभिमान -
पालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक सुरू करण्यात आले. हेरिटेज वॉक हा इंग्रजी शब्द कशाला, त्याऐवजी 'वारसा इमारत सहल', `वारसा चाल' असे शब्द वापरावेत का असा प्रश्न उपस्थित करत त्यासाठी मराठी शब्द शोधा, अशी सूचना पवार यांनी केली. तसेच पालिका मुख्यालयाची इमारत उभारणारे मराठी व्यक्तीच होते याचा अभिमान असला पाहिजे असे पवार म्हणाले.
आयुक्तांना खडसावले -
पालिका आयुक्तांनी आपल्या कार्यालयाबाहेर आपल्या नावाचा फलक लावला आहे. लालभडक नाव रंगगवण्यात आले आहे. पूरातन वास्तुमध्ये हे योग्य वाटत नाही. पुरातन वास्तूला साजेशे अशी रंगसंगती आणि वस्तू वापरून नावाचे फलक लावण्याचा सूचना केल्या.
नाइट लाइफमध्ये कायदा सुव्यवस्था महत्त्वाची -
नाइट लाइफबद्दल बोलताना ते म्हणाले की, अनेकांची मते असू शकतात. सर्वांना हे आवडणारे नाही. पण आजच्या तरुण पिढीस नाइट लाइफ ही संकल्पना आवडणारी आहे. ही आताची गरज असून कायदा आणि सुव्यस्था चांगली राहील, हे पाहिले पाहिजे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
मुंबईचा बकालपणा दूर करा -
नुसत्या जु्न्या इमारतींना हेरिटेज दर्जा देऊन भागणार नाही. मुंबई सुंदर कशी होईल हे पाहिले पाहिजे. कुलाब्यापासून मुंबईतले सर्व पदपथ सुंदर झाले पाहिजेत. मुंबईतील झोपड्याही हटल्या पाहिजेत. मुंबईचा बकालपणा दूर केला पाहिजे. अर्थात झोपडीवासीयांना हुसकावून नव्हे, तर त्यांना योग्य पर्याय, योग्य मोबदलाही दिला पाहिजे. त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात येऊ नये, असेही त्यांनी सांगितले.