मुंबई - विधान परिषदेमध्ये नियम 260 अन्वये विरोधकांनी प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये राज्यातील अनेक प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्याचे काम विरोधकांनी केले होते. विशेष करून राज्यातील साखर कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता. या प्रस्तावावर मागील दोन दिवस चर्चा सुरू होती. या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांनी लावलेल्या आरोपावर सडेतोड उत्तर दिले, परंतु जेव्हा विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हे २६० प्रस्तावावर बोलत होते व ज्या आवेशाने ते बोलत होते ते पहाता, दरेकर साहब को गुस्सा क्यू आता है? असे अजित पवार म्हणाले.
'दरेकर साहब को गुस्सा क्यो आता है?' : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मी सुद्धा सहकार चळवळीतून पुढे आलेलो आहे. २६० या प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर ज्या आवेशाने व तावातावाने बोलत होते, ते पाहता मी सुद्धा अवाक झालो. शेवटी दरेकर साहब को गुस्सा क्यो आता है? असेच मला वाटले. सर्वांनी सहकाराला ताकद देण्याचे काम या अगोदरच्या सहकार मंत्र्यांनी केलेले आहे. परंतु आता ती पहिली पिढी राहिलेली नाही. साखर कारखाने विकले गेले. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे सांगणे सोपे आहे. परंतु याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत नेहमी आरोप केले जातात पण त्याची वस्तुस्थिती काय आहे हे सर्वांना माहित असायला हवे. जरंडेश्वर प्रकरणावरून होत असलेले आरोप खोडून काढताना या गोष्टीला आता अनेक वर्षं झाली आहेत. परंतु त्याचा आता अतिरेक झाला आहे. यामध्ये असे आकडे सांगितले जातात की डोकं चक्रावून जात. इतक्या हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा वारंवार सांगितले जात आहे. मागच्या सरकारने सीआयडी चौकशी केली. एसीबीने चौकशी केली. इओडब्लू चौकशी केली. सहकार विभागाने न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या माध्यमातून चौकशी केली परंतु त्यामध्ये कोणाला काहीही गैर प्रकार सापडलेला नाही, असेही अजित पवार म्हणाले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या कमिटीने सुद्धा काही निर्णय घेतले होते व साखर कारखाने उच्च किमतीमध्ये विकले गेले.
साखर कारखान्यांना हमी बंद : राज्यातील संपूर्ण ऊस जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत साखर कारखाने बंद होऊ देणार नाही, असेही अजित पवार यांनी सभागृहात सांगितले. आजही ११ साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी शिल्लक आहेत ते चालवायची कोणाची तयारी असेल तर अटी शर्ती मान्य करून आम्ही ते भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी तयार आहोत, असेही अजित पवारांनी सांगितले. या अगोदर साखर कारखान्यांना हमी दिली जात होती. परंतु आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साखर कारखान्यांना हमी द्यायची नाही असा पवित्रा घेतला आहे. हे पचायला जरा जड असले तरीसुद्धा ते करणेही गरजेचे आहे, असेही अजित पवार म्हणाले. राज्यात साखर कारखान्याच्या बाबतीत पूर्ण पारदर्शकता आणली गेली असून यंदाच्या वर्षी सर्वात जास्त साखर निर्यात केली गेली आहे, ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे, असेही पवार म्हणाले. सहकारमध्ये आमच्याकडून कधीही राजकारण आणले जाणार नाही.
'वीज तोडणी फक्त रब्बी हांगामापर्यंत बंद' : शेतकर् यांच्या वीज तोडणी प्रकरणावर सभागृहांमध्ये अनेकदा गदारोळ झाला. यापूर्वीसुद्धा विरोधकांनी वीज तोडणी बंद करा याबाबत बरीच आंदोलने केली व शेवटी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला की तीन ते चार महिने वीज तोडणी केली जाणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु माझे असे स्पष्टपणे सांगणे आहे, की ही वीज तोडणी फक्त रब्बी हंगामापूर्ती आहे. रब्बी हंगामाचे पिक आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांची ही सवलत बंद केली जाणार आहे. म्हणून त्यांनी रब्बी हंगामानंतर जी थकबाकी आहे, ती भरावी व ऊर्जा खात्याला मदत करावी, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.
हेही वाचा - Praveen Darekar Aggressive In LC : दरेकर भडकले! उपसभापतींवर केला पक्षपातीपणाचा आरोप