मुंबई - आज सकाळी भाजपच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायर्यांवर कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांची 520 कोटी रुपये बुडवल्याप्रकरणी आंदोलन केले. भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी हे आंदोलनात सहभागी होते. जवळपास सात हजारहून अधिक ठेवीदारांचे पैसे हे बँकेमध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे सगळे ठेवीदार चिंतित आहेत.
कर्नाळा बँकेने 520 कोटी रुपये बुडवले-
कर्नाळा बँकेने 520 कोटी रुपये बुडवलेले असून 17 फेब्रुवारी 2020 रोजी यासंदर्भात गुन्हा दाखल होऊन देखील कारवाई केली जात नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या आमदारांनी आज सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या आंदोलनामध्ये प्रशांत ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली.
ठेवीदार चिंतित-
त्याचबरोबर प्रशांत ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या बँकेचे संचालक व माजी आमदार विवेक पाटील यांच्या संदर्भात कोणताच गुन्हा सरकारकडून नोंदवला जात नाही. सरकार याबाबतीत किती गांभीर्याने विचार करत आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे निर्माण होत आहे. तसेच विवेक पाटील यांनी कोर्टामध्ये आपली चूक कबूल केली असून देखील तरी त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई झाली नाही. सगळेच ठेवीदार मात्र चिंतित आहेत. त्यामुळे सरकारच्या या प्रकरणांमध्ये आम्ही लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन केले.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली दखल-
सभागृहामध्ये यासंदर्भात आम्ही प्रश्नदेखील विचारला परंतु सरकारने योग्य ते उत्तर दिले नसल्यामुळे आम्ही या संदर्भात आज आंदोलन केले. याची दखल सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली आणि त्यांनी आम्हाला यासंदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी बैठक लावू, असे सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचे प्रशांत ठाकूर म्हणाले.
हेही वाचा- 'शांताबाई राठोड पूजा चव्हाणच्या नाहीतर भाजपाच्या आजी'